वर्धा : निवडणुका टप्प्यात दिसत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अचानक सक्रीय झाला असून पक्षाच्या युवक आघाडीने वर्धापनदिनाच्या निमित्ताने पंधरवडाभर विविध आंदोलने केली. विशेष म्हणजे, इंधन दरवाढ, जीवनावश्यक वस्तूंचे चढे दाम, मूलभूत सुविधांचा अभाव, शेतमालाचे पडते दर, तुरीची रखडलेली खरेदी, बाजारात पडून असलेला चणा, महावितरणमुळे शेतकऱ्यांना होणारा मन:स्ताप या सर्वसामान्यांच्या दैनंदिन विषयावर ही आंदोलने करण्यात आल्याने लोकांचाही उत्तम प्रतिसाद लाभला. आंदोलनाच्या माध्यमातून राकॉंच्या या सक्रियतेने सारेच विरोधी पक्ष मौनच बाळगून असल्याच्या समजाला फाटा दिला आहे.

सरकार चार वर्षांत चांगली कामगिरी बजावल्याचा ढोल वाजवत आहे. आम्हीही त्यांचा चार वर्षांचा लेखाजोखा जनतेपुढे मांडत आहोत. ‘अच्छे दिन’ आलेच नाही. लोकांना खोटी आश्वासने देण्यात आली. केवळ रस्ते म्हणजे विकास नव्हे. सर्वसामान्यांचा विचारच केला गेला नाही. आरोग्य, शिक्षण, मूलभूत सुविधा कोसो दूर आहे. शेतकऱ्यांची शुद्ध फ सवणूक चालली आहे. दरवर्षी एक कोटी रोजगार देण्याचे आश्वासन देत युवकांची मते मिळण्यात आली, पण आता सर्वच क्षेत्रातील युवक नोकऱ्यां अभावी त्रस्त आहेत. असे आता आंदोलनातून दिसून येत असल्याचे प्रदेश रायुकाँचे उपाध्यक्ष समीर देशमुख यांनी नमूद केले. अवकाळी पावसाची व बोंडअळीने झालेल्या हानीची भरपाई देण्याचे केवळ आश्वासन ठरल्याचे शेतकरीच सांगत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

ज्येष्ठ नेते सक्रिय होण्याची अपेक्षा

समस्यांनी त्रस्त होऊन शेवटी जनताच आम्हाला निवडून देईल, अशा भावना काही विरोधी पक्षनेते बोलून दाखवतात. परिणामी ‘देईल हरी’ अशा भूमिकेतील विरोधी नेते आंदोलनाचे हत्यारच विसरून गेले आहे. सरकारला जाब विचारणार कोण, हा जनतेला पडलेला प्रश्न अनुत्तरितच होता. या पाश्र्वभूमीवर रायुकाँचे  आंदोलन चर्चेत आले. भाजीमंडी, पेट्रोलपंप, बाजारपेठ, चौरस्ते, बाजार समित्यांचे आवार, शाळा-महाविद्यालये व अन्य ठिकाणी रायुकाँचे कार्यकर्ते लोकांशी संवाद साधत आहेत. राकाँला निवडणुकीत विदर्भात नाकारण्यात आले. त्यानंतर पुढील छोटय़ामोठय़ा निवडणुकीतही अपयशच आले. त्यामुळे त्यातून धडा घेऊन ज्येष्ठ नेते कामाला लागण्याची अपेक्षा होती, पण निकाल लागल्यानंतर झोपी गेलेल्या बहुतांश नेत्यांना आता युवक काँग्रेसची आंदोलने जाग आणणारी ठरावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

‘‘पक्षातर्फे  हल्लाबोल आंदोलन राज्यभर झाले. त्यातून चतन्याचे वारे सुरू झाले, पण सरकारविरुद्ध दाद मागण्याची प्रक्रिया सतत सुरू असावी म्हणून युवक शाखेची आंदोलने बोलकी ठरत आहे. युवकांचा या आंदोलनास लक्षणीय प्रतिसाद मिळत असल्याने सरकारविरोधात जनता क्षुब्ध असल्याचे दिसून येते. आता तर ज्येष्ठ नेतेही या आंदोलनात सहभागी होत असून पक्षासाठी ते सुचिन्ह ठरावे.’’

किशोर माथनकर, नेते राष्ट्रवादी काँग्रेस</strong>