काश्मीरमधल्या दगडफेकीच्या वाढत्या घटनांमागे राष्ट्रविरोधी शक्तींता हात असल्याचं केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी सांगितलं. ते नाशिकमध्ये बोलत होते. या राष्ट्रविरोधी शक्तींना गेली ६० वर्ष भारताशी समोरासमोर लढता आलेलं नाही. त्यामुळे ते आता छुप्या पध्दतीने भारताला त्रास देण्यासाठी या कारवाया करत असल्याचं भामरे म्हणाले.  नाशिक येथील स्वामी नारायण स्कूल येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील माजी सैनिक अधिवेशनात ते बोलत होते.

या राष्ट्रविरोधी शक्ती काश्मीरमधल्या तरूणांना भडकवत असल्याचा आरोप त्यांनी केला. या तरूण मनांवर त्यांची दिशाभूल करणाऱ्या खोट्यानाट्या गोष्टी त्यांना सांगितल्या जाऊन त्यांना लष्करावर हल्ले करायला प्रवृत्त केलं जातंय असं त्यांनी सुचवलं.

काश्मीरमध्या बुरहान वानी या दहशतवाद्याच्या मृत्यूनंतर सुरू झालेलं दगडफेकींत सत्र सुरू झालं आहे. ही दगडफेक सशस्त्र दलांवर प्रामुख्याने होते आहे. कुठेही गणवेशातलेस सैनिक दिसलेस की त्यांच्यावर तरूणांकडून दगडफेक होते. यात लष्कराचे अनेक जवान गंभीर जखमी होतात. स्वसंरक्षणार्थ गोळीबार करण्यालाही अनेकदा अडचणी येतात कारण या गोळीबारीमध्ये कोणी जखमी किंवा मृत्युमुखी पडलं तर जनतेच्या रोषात आणखी वाढ होते.

केंद्र सरकारचे या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असून याठिकाणी होणारा हिंसाचार थांबविण्यासाठी विशेष रणनीती आखण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

आपल्या भाषणादरम्यान सुभाष भामरे यांनी सध्या पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या कुलभूष जाधव यांच्याविषयीही भाष्य केलं. कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी भारत सरकार प्रयत्नशील असल्याचेही ते यावेळी म्हणाले. डॉ. भामरे यांनी कुलभूषण जाधव हे रॉ चे एजंट नसल्याचे पुन्हा एकदा ठणकावून सांगत पाकिस्तानने याप्रकरणी कोणतेही अनुचित पाऊल उचलल्यास भारत हे कदापि सहन करणार नसल्याचा इशाराही त्यांनी पाकिस्तानला दिला. तसेच माजी सैनिकांच्या विविध मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतले जातीस असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.