पूर्व विदर्भातील नक्षलवादविरोधी मोहिमेने गेल्या वर्षीच्या जुलैपासून अतिशय चांगली कामगिरी बजावल्याने पोलीस दलाला गेल्या नऊ महिन्यात तब्बल २५ नक्षलवाद्यांना ठार मारण्यात यश मिळाले आहे. गेल्या चार वर्षांतील हे सर्वोच्च यश असून माओवाद्यांसाठी नेहमीच कर्दनकाळ ठरलेल्या सी-६० च्या पथकाची पुनर्रचना केल्यामुळेच ते मिळू शकल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

गनिमी युद्धात तरबेज असलेल्या नक्षलवाद्यांविरुद्ध लढण्यासाठी राज्यांनी स्थापन केलेल्या विशेष पथकात तेलंगणाच्या ग्रेहाऊंडचा क्रमांक अगदी वरचा आहे. या पथकाने राज्यातील चळवळीचा बीमोड तर केलाच, पण शेजारच्या राज्यात घुसून नक्षलवाद्यांना टिपून काढल्याची अनेक उदाहरणे अलीकडच्या काळात समोर आली आहेत. ग्रेहाऊंडनंतर नाव घेतले जाते ते गडचिरोली पोलीस दलाने तयार केलेल्या सी-६०च्या पथकांचे. या पथकांची कामगिरीसुद्धा प्रभावी राहिली आहे. मात्र, गेल्या नऊ महिन्यांचा काळ वगळता आधीची चार वर्षे अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या पथकाकडे दुर्लक्ष केले. माओवाद्यांच्या हालचाली, ठावठिकाणा कळूनही त्याविषयी तत्परता न दाखवणे, मोहिमा न आखणे, सी-६० च्या अडचणींकडे दुर्लक्ष करणे, या पथकातील जवानांशी संवाद न ठेवणे, धाडसी मोहिमा आखण्याला परवानगी न देणे, सी-६० मधील जवानांना मोहिमेच्या काळात बचावात्मक पवित्रा घेण्याविषयी सांगण्याचे प्रकार आधीच्या अधिकाऱ्यांनी सुरू केले होते. त्याचा प्रतिकूल परिणाम या पथकावर झाला व यात काम करणारे अनेक धाडसी जवान, कमांडर पथक सोडून दुसरीकडे निघून गेले. काहींनी जिल्ह्य़ाबाहेर बदली करवून घेतली. या पथकाच्या प्रभावी कामगिरीमुळे यातील जवान व विशेषत: कमांडर नेहमीच माओवाद्यांच्या हिटलिस्टवर राहिले आहेत. यापैकी अनेकांच्या कुटुंबातील सदस्यांना नक्षलवाद्यांनी ठार केले आहे. त्यांच्या या वैयक्तिक हानीकडे दुर्लक्ष करत काही अधिकाऱ्यांनी या जवानांना त्रास देण्याचे प्रकार या काळात घडले. त्यामुळे या पथकाची कामगिरी ढेपाळली होती. अंकुश शिंदे यांनी गडचिरोली गोंदिया परिक्षेत्राचे पोलीस उपमहारनिरीक्षक म्हणून पदभार सांभाळल्यानंतर सर्वप्रथम या पथकाची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला. आर.आर. पाटील गडचिरोलीचे पालकमंत्री असताना प्रत्येक भेटीत ते या पथकांशी थेट संवाद साधायचे. त्यावेळी अधिकाऱ्यांना गैरहजर ठेवले जायचे. शिंदे यांनी हा संवाद सुरू केला. सोडून गेलेल्या अनेक जुन्या कमांडरांना परत बोलावण्यात आले. नक्षलवाद्यांबाबत मिळणारी माहिती व त्याद्वारे आखण्यात येणाऱ्या मोहिमांमध्ये सुसूत्रता आणली. पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख व सर्व उपविभागातील अधिकाऱ्यांनी या पथकाच्या वैयक्तिक अडचणीत लक्ष घातले. याचा योग्य तो परिणाम दिसून आला. गेल्या वर्षीच्या जुलैपासून या पथकांची कामगिरी अतिशय प्रभावी होत गेली. सी-६० मध्ये परत आलेल्या जुन्या कमांडरांनी नक्षलवाद्यांना टिपणे सुरू केले. त्याआधीची चार वर्षे कोणतीही चकमक झाली की पळून गेलेल्या माओवाद्यांचे सामान (पिट्टू) गोळा करून आणणारी ही पथके आता त्यांचे मृतदेह आणू लागली आहेत. गेल्यावर्षी जानेवारी ते जून या काळात २३ चकमकी झाल्या व त्यात केवळ एका माओवाद्याला ठार करण्यात या पथकांना यश मिळाले होते. नंतरच्या सहा महिन्यात म्हणजे जुलै ते डिसेंबर या काळात याच पथकांनी तब्बल १८ नक्षलवाद्यांना ठार केले. या वर्षी आतापर्यंत सात नक्षलवाद्यांना ठार केले. वरिष्ठांच्या प्रयत्नानंतर सी-६० मध्ये परत आलेल्या एका कमांडरने गतवर्षी डिसेंबरमध्ये सिरोंचा तालुक्यात तब्बल नऊ नक्षलवाद्यांना ठार केले. सुरक्षेसाठी या कमांडरचे नाव जाहीर करणे योग्य नसले तरी यंदा याच महिन्यात याच कमांडरने त्याच परिसरात पुन्हा तीन माओवाद्यांना टिपले. यात एका विभागीय समिती सदस्याचा समावेश आहे. या कामगिरीमुळे गेल्या चार वर्षांत पुन्हा उभारण्यात आलेले सिरोंचा दलम पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

नक्षलवाद्यांच्या विरोधात थेट लढणाऱ्या या पथकाची पुनर्रचना केल्याचे फायदे आता दिसून येत आहेत. या पथकात चांगली कामगिरी करणाऱ्या जवानाला तातडीने पदोन्नती देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे जवानांचे मनोबल उंचावले आहे. येत्या काळातसुद्धा हे पथक तसेच पोलीस मदत केंद्रातील जवानांची कामगिरी उंचावेल, अशी आशा आहे.

अंकुश शिंदे, विशेष पोलीस महानिरीक्षक