11 December 2017

News Flash

भ्रष्टाचारविरोधी देशव्यापी मोहिमेचा प्रारंभ पाटण्यातूनच-हजारे

पाटणा येथे ३० जानेवारीला होणाऱ्या भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाच्या रॅलीस सरकारने परवानगी नाकारली असली तरी

वार्ताहर, पारनेर | Updated: December 29, 2012 5:49 AM

पाटणा येथे  ३० जानेवारीला होणाऱ्या भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाच्या रॅलीस सरकारने परवानगी नाकारली असली तरी ही रॅली होणारच, असा निर्धार हजारे यांनी आज पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. तसेच भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाच्या जनजागृतीसाठी काढण्यात येणाऱ्या देशव्यापी दौऱ्याची जबाबदारी माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंग यांच्यावर टाकण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
सिंग यांनी शुक्रवारी दुपारी राळेगणसिद्घीत हजारे यांची भेट घेऊन पुढील महिन्यापासून सुरू होणाऱ्या हजारे यांच्या देशव्यापी दौऱ्यासंदर्भात चर्चा केली. त्यानंतर हजारे व सिंग यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दरम्यान, सरकारने आपली सुरक्षा काढली असली तरी आपणास काही फरक पडत नसल्याचे माजी लष्करप्रमुख सिंग यांनी सांगितले.
राळेगणसिद्घी येथील कार्यकर्ता प्रशिक्षण केंद्रात हजारे व स्िंाग यांनी आगामी दौऱ्याविषयी चर्चा केली. भारत विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनायकराव पाटील हे सिंग यांच्या समवेत होते. ३० जानेवारीपासून हजारे हे आगामी लोकसभा निवडणुकांसाठी देशव्यापी जनजागृती मोहीम सुरू करणार असून निवडणुकांपर्यंत ही मोहीम सुरूच राहणार आहे. बिहारमधील पाटणा येथे गांधी मैदानावरील रॅलीने या मोहिमेस प्रारंभ करण्यात येणार आहे. या रॅलीस सरकारने परवानगी नाकारल्याने अण्णा या रॅलीस उपस्थित राहणार की नाही याविषयी संदिग्धता होती. परंतु परवानगी मिळाली नसली तरीही ही रॅली होणार असल्याचे ठामपणे सांगून आपण या रॅलीस उपस्थित राहणार असल्याचे हजारे यांनी सांगितले.
खासदार अभिजीत मुखर्जी यांच्या वक्तव्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी हजारे यांनी या विषयाला बगल दिली. उलट या वादात राष्ट्रपतींना का ओढता, असा सवाल केला.   देशात बदल अपेक्षित असेल तर युवकांसह जनतेने या रॅलीस मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सिंग यांनी यावेळी  केले. सरकारने काढलेल्या सुरक्षेविषयी विचारले असता सिंग म्हणाले, सुरक्षा असो, नसो आपणास काहीच फरक पडणार नाही. हजारे यांना साथ दिल्यामुळे सुरक्षा काढली का, असे विचारले असता ते तुम्ही सरकारलाच विचारा, हजारे यांच्यासोबत मी पूर्वीपासूनच आहे, असेही ते म्हणाले.

First Published on December 29, 2012 5:49 am

Web Title: anticurruption nationwide campaign will start from patna anna hajare