महापालिकेतील गटनेत्यांच्या बैठकीत निर्णय

नगर : करोना संचारबंदीच्या काळात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांची, रस्त्यावरच ‘अँटीजेन टेस्ट’ करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. तसेच प्रशासनानेही विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करावी, अशी सूचना महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केली. नागरिकांच्या हितासाठीच संचारबंदी लागू करण्यात आली आहे, त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर न पडता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

करोनाचा प्रादुर्भाव प्रतिबंधक उपाययोजनांसाठी महापौर वाकळे यांनी आज, सोमवारी सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांची रस्त्यावरच ‘अँटिजेन टेस्ट’ करण्याचा निर्णय घेण्यात आला. सभापती अविनाश घुले, विरोधीपक्ष नेते संपत बारस्कर,  मालन ढोणे, रोहिणी शेंडगे, सुप्रिया जाधव, संजय ढोणे, अजय चितळे, सतीश शिंदे, सचिन जाधव, अनिल बोरूडे आदी उपस्थित होते.

रुग्णालयांत करोनाग्रस्तांसाठी जागा शिल्लक नाही. प्राणवायू व रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे, त्यामुळे करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी घरीच थांबून सहकार्य करावे, लक्षणे दिसत नसली तरी सकारात्मक अहवाल असणाऱ्या रुग्णांनी लगेच ‘कोविड केअर सेंटर’मध्ये दाखल व्हावे, असे आवाहन महापौर वाकळे यांनी केले. एमआयडीसीमध्ये रमेश लोढा यांच्या कारखान्यातून उद्या, मंगळवारपासून ६०० टाक्या प्राणवायू उपलब्ध होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

सभापती अविनाश घुले यांनी सांगितले,की मनपाने कोविड रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा व औषधोपचार वेळेत मिळण्यासाठी नियोजन करावे. विरोधीपक्ष नेते बारस्कर यांनी, मनपाच्या वतीने प्राणवायूचा प्रकल्प, रुग्णालय उभारण्याची तर अजय चितळे यांनी मनपाच्या कोविड सेंटरमध्ये प्राणवायूची सुविधा असणाऱ्या खाटा उपलब्ध करण्याची मागणी केली.

‘औषधांसाठी नगरसेवकांना रोख निधी द्या’

या वेळी बसपच्या नगरसेविका अश्विनी जाधव यांनी सर्व नगरसेवकांना त्यांचा निधी रोख स्वरूपात करून द्यावा, या निधीतून करोना रुग्णांसाठी आवश्यक असणारी साधनसामग्री व औषधे घ्यावीत, त्यामुळे गरीब व गरजू रुग्णांना दिलासा मिळेल, या मागणीचे पत्र महापौर व आयुक्तांना दिले.