जव्हार, मोखाडय़ात करोना रुग्णांचा शोध घेण्याचा प्रयत्न

पालघर : जिल्ह्यतील ग्रामीण भागात करोना संसर्ग झालेल्यांचा  शोध घेण्यासाठी जव्हार व मोखाडा या शहरांमध्ये बँकेमध्ये प्रवेश करण्यापूर्वी शासनातर्फे प्रतिजन चाचणी  मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून तीन दिवसांत १४ करोना रुग्ण आढळले आहेत.

जिल्ह्यच्या दुर्गम भागात करोना संसर्ग मर्यादित स्वरूपात असला तरी त्याचा नव्याने संक्रमण होऊ नये म्हणून शासनातर्फे  आशा व अंगणवाडी सेविकांतर्फे ग्रामपातळीवर सर्वेक्षण व देखरेख प्रक्रिया राबवण्यात येत आहे. असे असताना दुर्गम भागातील नागरिकांना करोना आजाराची लक्षणे आढळल्यास  ते तपासणीसाठी पुढे येत नसल्याचे दिसून येते.

यावर उपाय म्हणून बँकांमध्ये येणाऱ्या नागरिकांची बँकेच्या प्रवेशद्वाराजवळ प्रतिजन चाचणी विनामूल्य करण्याची पद्धत आरोग्य विभागाने सुरू केली आहे. मोखाडा येथे गुरुवारपासून तर जव्हार येथे  शुक्रवारपासून बँकेच्या प्रवेश द्वाराजवळ उभारण्यात येणाऱ्या हंगामी प्रतिजन चाचणी केंद्रांमध्ये ही तपासणी करण्यात येत आहे. यामुळे संसर्ग झालेल्या नागरिकांचा शोध लागून त्यांना तातडीने औषधोपचार सुरू करणे शक्य होईल, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती जव्हारचे अपर जिल्हाधिकारी दिलीप गुट्टे यांनी सांगितले.

जव्हार व मोखाडा या शहरांमधील बँकांमध्ये नेहमीच गर्दी होत असते. सध्या खावटी योजनेतील निधीचे वाटप सुरू झाल्याने ही रक्कम काढण्यासाठी ग्रामीण भागातील ग्रामस्थ मोठय़ा संख्येने येत आहेत. त्याचा लाभ घेऊन प्रतिजन चाचणीची विशेष मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती दिलीप गुट्टे यांनी दिली.

१४ जणांना संसर्ग

जव्हार येथील पाच बँकांमध्ये दिवसभरात २२२ जणांची  प्रतिजन चाचणी करण्यात आली असून यामध्ये दोन जणांना करोना संसर्ग झाल्याचे आढळले. मोखाडा येथील चार बँकांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या ७३३ नागरिकांच्या गेल्या तीन दिवसांत तपासणी झाली आहे. त्यापैकी १२ नागरिकांना संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. प्रतिजन चाचणी करण्यासाठी जव्हार व मोखाडा तालुक्यात पुरेशा प्रमाणात प्रतिजन चाचणी संच उपलब्ध असल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी यांनी दिली.