नाशिक : इगतपुरी तालुक्यातील  कसारा घाटात गुरूवारी पहाटे मुंबईहून गोरखपूरला जाणाऱ्या अंत्योदय हमसफर गोरखपूर एक्स्प्रेसच्या डब्याचे चाक घसरले.  घाटातील ऐन पुलावर ही घटना घडल्यानंतर चालकाने प्रसंगावधान राखत गाडी थांबविल्याने मोठा अपघात टळला. यामुळे मध्य रेल्वेची एका बाजूची वाहतूक ११ ते १२ तासानंतर सुरळीत झाली.

गुरूवारी पहाटे मुंबईहून गोरखपूरला जाणारी अंत्योदय हमसफर एक्स्प्रेस कसारा सोडून घाटातील ब्रिटीशकालीन भीमा-२ पुलावर पावणेचारच्या सुमारास आली असता इंजिनापासून दुसऱ्या क्रमांकाचा  डबा रुळावरून घसरला. यामुळे मोठा आवाज झाला. हा प्रकार चालकाच्या लक्षात येताच त्याने प्रसंगावधान राखत गाडी थांबवली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. गाडी थांबवली नसती तर थेट सुमारे दीडशे फुट खोल दरीत डबे कोसळले असते. गाडी पुलावरच थांबल्याने मुंबईला जाणारी राज्यराणी एक्स्प्रेस आणि मुंबईहून येणारी भुसावळ एक्स्प्रेस रद्द करण्यात आली. अंत्योदयमधील प्रवाशांना इगतपुरीहून गोरखपूरकडे दुसऱ्या गाडीने रवाना करण्यात आले. गीतांजली, साकेत आणि पुष्पक एक्स्प्रेस या गाडय़ांनाही उशीर झाला.

पुलावरच गाडी थांबल्याने मदतकार्यात अडचणी निर्माण झाल्या. प्रवासी अधांतरी अडकल्याने त्यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. रेल्वे प्रशासनाच्या आपत्कालीन विभागाकडून घटनेची माहिती मिळताच तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले. सुमारे १२ तासानंतर नादुरूस्त गाडी इगतपुरीपर्यंत आणण्यात आल्यावर वाहतूक सुरळीत झाली.