अनुराधा पौडवाल यांचा सवाल, शनिशिंगणापूर येथे शनिदेवाचे दर्शन

श्रीरामपूर : देशात विविध ठिकाणी महिला अत्याचाराच्या घटना घडत आहेत. पण महिला संघटनांच्या नेत्या गप्प बसून आहेत. अत्याचार करणाऱ्या प्रवृत्तीच्या विरोधात त्या लढाई का लढत नाहीत, असा उद्विग्न सवाल प्रसिद्ध  गायिका  अनुराधा पौडवाल यांनी केला आहे.

गायिका अनुराधा पौडवाल यांनी आज शनिशिंगणापूर ( ता. नेवासे ) येथे शनिदेवाचे दर्शन घेतले. शनिदेवाला अभिषेक केला. यावेळी पोलीस पाटील सयाराम बानकर यांच्या हस्ते त्यांचा माहेरची साडी देऊ न सत्कार करण्यात आला. पौडवाल यांनी शनिदेवाला भाऊ मानले आहे. रक्षाबंधन व भाऊ बीजेला त्या शनिदेवाच्या दर्शनाला येत असतात. त्यामुळे त्यांना माहेरची साडी दिली जाते.

पौडवाल म्हणाल्या, शनीशिंगणापूर येथे शनी चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्यासाठी आंदोलन करण्यात आले. चौथऱ्यावर चार पायऱ्या चढून जाण्यासाठी अट्टहास धरणाऱ्या महिला संघटना आज काय करत आहेत. देशात विविध ठिकाणी महिलांवर अत्याचार होत आहेत.

महिलांना जिवंत जाळले जाते. या घटना घडत असताना या महिला नेत्या गप्प का, त्या तेथे जाऊन आवाज का उठवत नाहीत. त्यांना काहीच कसे वाटत नाही, असा सवाल त्यांनी केला.

महिला नेत्या केवळ धार्मिक स्थळी आंदोलन करतात. प्रसिद्धी मिळवतात. चार उंबरे ओलांडले म्हणजे महिलांचे प्रश्न सुटले असे नाही. खरी गरज महिला अत्याचार रोखणे, त्यांना सुरक्षा देणे ही आहे.

महिला नेत्यांनी  असा धाक निर्माण करावा की जेणेकरून कोणी अत्याचाराचे धाडस करणार नाही, असे त्यांनी सांगितले.

पौडवाल यांनी चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेतले नाही. मात्र अभिषेक केला. त्यांनी शनीसाठी आणलेले तेल एका कर्मचाऱ्याकडे दिले. पौडवाल यांच्यावतीने त्याने ते शनीला वाहिले.