प्रशांत देशमुख, वर्धा

महानगरातील महिलांमध्ये कुपोषित महिलांचे प्रमाण लोकसंख्येच्या प्रमाणात अधिक असण्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र महिला काँग्रेसने ‘अपराजिता’ या उपक्रमास प्रारंभ केला आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसतर्फे ‘निश्चय केला आता, बनणार मी अपराजिता’ या उपक्रमास सुरूवात करण्यात आली.

या उपक्रमात वेबिनारच्या माध्यमातून विविध विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. महाराष्ट्रातील आदिवासीबहुल मेळघाटसारख्या भागांपेक्षाही मुंबई, पुण्यासारख्या शहरात कुपोषित महिलांचे प्रमाण अधिक आहे. कारण त्यांच्या दैनंदिन जीवनात फास्टफुडचे प्रमाण वाढत चालले आहे. या पाश्र्वाभूमीवर महिलांना सक्षम व सशक्त करण्याचे कार्य प्रबोधनाद्वारे महिला काँग्रेस करीत आहे. भगिनींना त्यांच्या आहाराबाबत जागृत करण्याची बाब अभिनंदनीय असल्याचे मत महिला व बालविकास कल्याणमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले.

अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या नेत्या व महाराष्ट्र प्रभारी आकांक्षा ओला यांनी टाळेबंदीच्या काळात महाराष्ट्र महिला काँग्रेसने केलेल्या कामाची प्रशंसा करीत आता स्वस्थ महिला सशक्त भारत ही भूमिका घेवून महिला करीत असलेले कार्य अभिनंदनीय असल्याचे मत व्यक्त केले. महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा अ‍ॅड. चारूलता टोकस यांनी महिलांना स्वस्थ व सक्षम करण्याचा विचार इंदिरा गांधी यांनी १९८३ साली मांडला होता. त्याअंतर्गत विविध योजना सुरू करण्यात आल्या होत्या. एक महिला दुसऱ्या महिलेच्या दु:खाला समजू शकते, ही जाणीव ठेवून महिला काँग्रेसतर्फे अपराजिता हा उपक्रम सुरू करण्यात आल्याचे श्रीमती टोकस यांनी सांगितले.

निर्मला निकेतन मुंबईच्या डॉ. अनुराधा मित्रा यांनी पोषण आहार, उर्जा नियंत्रण, लोह प्रमाण, व्हिटॅमिनची आवश्यकता व अन्य विषयावर स्लाईड शोच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. डॉ. स्मिता शहापूरकर यांनी कार्यक्रमाची भूमिका मांडली. उत्कर्षा रूपवते यांनी सहभागी सर्व महिला पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.