News Flash

‘त्या’ शपथेबाबत अखेर माफी व दिलगिरी!

ज्या विद्यार्थिनींना आम्ही ही शपथ दिली त्या बहुतांश मुली किशोरी आहेत

(संग्रहित छायाचित्र)

चांदूर रेल्वे येथील महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी ‘प्रेमविवाह’ न करण्याची शपथ घेतल्यानंतर उमटलेल्या तीव्र प्रतिक्रियांच्या पाश्र्वभूमीवर महाविद्यालयाचे प्राचार्य आणि शपथ देणाऱ्या प्राध्यापकांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

महिला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या टेंभुर्णी येथील निवासी विशेष शिबिरात विद्यार्थिनींना ‘प्रेम व प्रेमविवाह न करण्याची’ शपथ एका सत्रात देण्यात आली होती. त्यावर प्रसार आणि समाज माध्यमांतून प्रतिक्रिया उमटल्या.  ही शपथ ही उन्मादी प्रेमाच्या विरोधात होती. तसे प्रास्ताविक आम्ही केले होते. मुलींच्या अजाणतेपणाचा फायदा घेऊन काही तरुण मुले त्यांना प्रेमाच्या नावाखाली जाळ्यात ओढतात आणि नंतर मुलींना त्रास देतात. त्यातून वाईट घटना घडतात. त्याचे परिणाम आपल्यासह पालकांना सहन करावे लागतात. म्हणून अशा घटनांना वेळीच लगाम लावणे आवश्यक असते. त्यासाठी मुलींनी आधी आपले शिक्षण व आपले करिअर घडविण्यासाठी सतत लक्ष दिले पाहिजे, या भावनेने आम्ही ती शपथ विद्यार्थिनींना दिली होती. परंतु या शपथेमुळे काही लोकांच्या भावना दुखावल्या; तसेच व्यक्तिस्वातंत्र्याचाही मुद्दा उपस्थित झाला. यास्तव त्या शपथेमुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील; आणि व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच झाला असा प्रत्यय त्यातून आला असेल तर आम्ही अशा सर्व लोकांची नम्रपणे माफी मागतो आणि दिलगिरी व्यक्त करतो, असे प्राचार्य डॉ. राजेंद्र हावरे आणि राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. प्रदीप दंदे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

ज्या विद्यार्थिनींना आम्ही ही शपथ दिली त्या बहुतांश मुली किशोरी आहेत. प्रेमाच्या नावावर  काही तरुणांकडून त्यांची फसगत होते. म्हणून अशा बाबींची चर्चा मुलींनी त्यांच्या पालकांसोबत करावी. वैचारिक अपरिपक्व तेतून चुकीचा निर्णय घेण्याऐवजी पालकांवर विश्वास ठेवणे नेहमीच हितकारक असते. या जाणिवेने ही शपथ  देण्यात आली होती. तरीही, त्यामागील हेतू बाजूला पडून वेगळाच आशय लोकांपर्यंत त्यातून पोहचत असेल तर आम्ही मन:पूर्वक माफी मागतो असे डॉ. हावरे आणि प्रा. दंदे यांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 16, 2020 1:43 am

Web Title: apologies and apologies for the oath abn 97
Next Stories
1 सरकार उद्या कशाला, आजच पाडा!
2 खरीप हंगामावर सोयाबीन बियाणे तुटवडय़ाचे संकट
3 शेती, व्यापार, उद्योगाबाबत देशाचे चित्र चिंताजनक – शरद पवार
Just Now!
X