गणेशोत्सवादरम्यान श्रींच्या मूर्तीचे आगमन व विसर्जनावेळी मिरवणूक काढू नये, तसेच आरती, भजन व किर्तनाचे कार्यक्रम घरीच करावेत. पुजा करताना भटजी ऑनलाईन असावेत,अशा सूचना जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिल्या आहेत.

गणेशोत्सवासाठी दि.१२ ऑगस्टपर्यंत येणाऱ्या नागरिकांना १० दिवस गृह अलगीकरणात राहावे लागणार आहे. त्यासाठी नागरिकांना कोणत्याही कोविड – १९ च्या तपासणीची आवश्यकता नाही. मात्र यानंतर नागरिक जिल्ह्यात प्रवेश करणार आहेत. त्यांना  किमान ४८ तास आधी करोना चाचणी अहवाल निगेटीव्ह असणे गरजेचे आहे. तसेच या व्यक्तींन ३ दिवस घराबाहेर पडू नये, स्थानिक आरोग्य विभागाने त्यांना कोणतीही लक्षणे नसल्याची खात्री करावी, असे निर्देश दिले आहेत.

सार्वजनिक गणेश मंडळांकरिता गणेश मूर्तीची उंची ४ फूट, तर घरगुती गणपतीकरिता मूर्ती २ फुटांची असेल.

यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करणे अपेक्षीत असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक गणपतीची सजावट करताना त्यात भपकेबाजपणा नसावा. सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेश दर्शनासाठी गर्दी होणार नाही. तसेच प्रत्यक्ष येऊन दर्शन घेणारे भाविक शारिरीक अंतराचे, स्वच्छतेचे नियम त्यात मास्क, सॅनिटायझर वापरणे पाळतात याची खात्री मंडळाचे अध्यक्ष यांनी करावी. मंडपामध्ये निर्जंतुकीकरणाचे तसेच थर्मल स्क्रिनिंगची व्यवस्था करण्यात यावी.

श्री गणेशाचे दर्शन सुविधा ऑनलाईन, केबल, वेबसाईट, फेसबूक इत्यादी द्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी. गणपती मंडळास भेट देणाऱ्या व्यक्तींची नोंद ठेवावी. जेणेकरून बाधीत रुग्ण आढळल्यास कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे सोपे होईल. उत्सव कालावधीत गणेश मंडळाबाहेर हार, नारळ, मिठाई दुकाने लावण्यात येऊ  नयेत. यंदा गणेशोत्सव कमीत कमी दिवसांचा साजरा करावा. घरगुती गणपतीची पूजा शक्यतो स्वत:च करावी. पुरोहित (भटजी) यांनी जास्तीत जास्त ऑनलाईन ( व्हीडिओ अ‍ॅप्स ) तंत्रज्ञानाचा वापर करावा.

गणेशोत्सव कालावधीत भजन, आरती, फुगडी, किर्तन, गौरी वोवसा आदी कार्यक्रम घरगुती स्वरुपात कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत साजरे करावेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने घरोघरी फिरून भेटी देणे टाळावे.

विसर्जनावेळी पारंपारिक पद्धतीने विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जन स्थळी  कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जन स्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील, वाडीतील, गावातील, इमारतीतील सर्व घरगुती गणेश मूर्तींच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रित पणे काढण्यात येऊ नये, शक्यतो घरा जवळच्याच विसर्जनस्थळी मूर्तीचे विसर्जन करावे. विसर्जनावेळी कोवीड- १९ बाबत सर्व प्रतिबंधात्मक उपाय योजनांचे पालन करावे याबाबत गाव समिती, प्रभाग समिती यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात खबरदारी घ्यावी.

कंटेन्मेंट झोनमध्ये हे आदेश लागू राहणार नाहीत. सदर कंटेन्मेंट झोनमध्ये उपविभागीय अधिकारी यांनी लागू केलेले प्रतिबंध लागू असणार आहेत. तसेच करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र, राज्य शासन व स्थानिक प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे अशा सूचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिल्या आहेत.