कोकणातील गिरणी कामगारांना घरे मिळावीत तसेच असंघटित कामगारांच्या प्रश्नासाठी राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या लढय़ात सर्वानी सामील व्हावे, असे आवाहन राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी केले.
राष्ट्रीय मिल मजदूर संघ व सिंधुदुर्ग गिरणी कामगार संघाचा कामगार मेळावा वैश्य समाज हॉलमध्ये संपन्न झाला तेव्हा मोहिते बोलत होते. यावेळी आमदार दीपक केसरकर, नगराध्यक्ष बबन साळगांवकर, उपाध्यक्ष बजरंग चव्हाण, जिल्हाध्यक्ष दिनकर मसगे, सुनील बोरकर, जी. बी. गावडे, साई निकम, रवींद्र सुर्वे, सुभाष शिंदे, विष्णू परब, शामसुंदर कुंभार, रमेश कानडे आदी उपस्थित होते.
यावेळी मोहिते यांनी गिरणी कामगार, त्यांचे वारस व असंघटित कामगारांसाठी आमचा लढा सुरू आहे. राज्यमंत्री सचिन अहीर कायमच कामगारांच्या प्रश्नासाठी झटत आहेत. त्यांच्या पुढाकाराने घरे लागलेल्या कामगारांना सक्तीचे सर्टिफिकेट केल्याने ७५ हजार रुपयांचा भरुदड पडणार पडणार होता ते सक्शेशन सर्टिफिकेट रद्द करून अ‍ॅफिडेव्हिट करण्यास मुभा दिल्याचे सांगितले.
आमदार दीपक केसरकर म्हणाले, मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनविण्यात गिरणी  व कामगारांचा वाटा आहे. या कोकणच्या गिरणी कामगारांना मुंबईतच घरे मिळायला पाहिजेत. त्यासाठी येत्या अधिवेशन काळात कोकणच्या आमदारांना एकत्रित करून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मागणी केली जाईल. कोकणाने गिरणी कामगारांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आ. केसरकर यांनी व्यक्त केली.
राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे उपाध्यक्ष बजरंग चव्हाण यांनी गिरणी कामगार, त्यांचे वारस, घरेलू व इमारत कामगारांसह असंघटित कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे सांगितले.
नगराध्यक्ष बबन साळगांवकर यांनी गिरणी कामगारांना  मुंबईतच घरे मिळायला हवी, त्यासाठी कामगारांनी जागृत राहून हक्कासाठी भांडावे, असे आवाहन केले.
जिल्हाध्यक्ष दिनकर मसगे यांनी यावेळी सिंधुदुर्ग गिरणी कामगार संघाची कार्यकारणी जाहीर केली.