प्रशांत देशमुख

हिंगणघाट जळीतकांडाबाबत संताप व्यक्त करताना जनतेने दाखवलेला संयम गांधीभूमीस पूरक असाच आहे. घटनेनंतरच्या पाच दिवसांत जिल्हय़ात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. घटनेमुळे धास्तावलेल्या पोलीस यंत्रणेने बाहेरील जिल्हय़ातून पूर्व खबरदारी म्हणून पोलीस कुमक मागवली असली, तरी अद्याप तरी सर्वत्र शांतता आहे.

पीडित प्राध्यापक तरुणी अत्यंत कठीण उपचाराला सामोरी जात आहे. तिच्या प्रकृतीसाठी प्रार्थना सुरू आहेत. घटनेच्या दिवशी हिंगणघाटकर तरुणाईने राष्ट्रीय महामार्गावर निदर्शने केली. मार्ग रोखून धरण्याचा हा एक प्रकार वगळता या शहराने पूर्णपणे शांतता जोपासली. दुसऱ्या दिवशी गावात निघालेला मोर्चा संयमी आणि शांततापूर्ण होता. बाहेरगावचे प्रवासी, पाहुणेसुद्धा मोर्चात सहभागी होऊन निषेध नोंदवत होते. याबाबत शिवसेना नेते माजी आमदार अशोक शिंदे म्हणतात, ‘या प्रकरणाकडे सर्व समाज जातीय दृष्टिकोनातून नव्हे तर विकृत घटना म्हणून पाहतो. निषेध नोंदवण्यात समाजातील प्रत्येक घटक आघाडीवर आला. सर्व राजकीय पक्ष, आंबेडकरवादी संघटना, स्वयंसेवी संस्थांनी रस्त्यावर उतरूनसुद्धा आपल्या भावना संयमाने व्यक्त केल्या. जिल्हय़ातील आठही तालुक्यातून मोठय़ा जनसहभागासह मोर्चे निघाले. प्रकरणाला राजकीय रंग चढू नये म्हणून प्रत्येक पक्षानेच संयमी भूमिका घेतली’.

मदतीच्या संदर्भात भाजपच्या चित्रा वाघ व राष्ट्रवादी काँग्रेसच्या रूपाली चाकणकर यांच्यात मात्र काहीवेळ कलगीतुरा रंगला. मदतीसंदर्भात वाघ यांनी शासनावर केलेल्या टीकेला उत्तर देताना चाकणकर यांनी हा श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रकार असल्याचे प्रत्युत्तर दिले होते. मी पक्ष म्हणून नव्हे तर एक महिला म्हणून मुलीच्या कुटुंबाच्या वेदना मांडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासोबतच पीडित कुटुंबास धीर देण्यासाठी विद्या चव्हाण, चारुलता टोकस, हेमलता मेघे, यशोमती ठाकूर, अरुणा सबाने, नूतन माळवी व अन्य महिला नेत्या पुढे आल्या. विदर्भातील सर्व मंत्री, बहुतांश आमदार व नेत्यांनी भेटीनंतर कुठलेही वक्तव्य करण्याचे टाळले.

मुलींनी घेतली शपथ..

रिपाइंनेते महेंद्र मुनेश्वर म्हणाले, पीडिता एका कुटुंबाची नव्हे तर महाराष्ट्राची कन्या झाली आहे. सावित्रीच्या लेकी सुरक्षित राहिल्याच पाहिजे. आरोपीच्या अमानवी विकृतीचे नाक शासनाने ठेचलेच पाहिजे. महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चारुलता टोकस यांनीही अशा घटना तात्काळ हाताळण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हय़ात विशेष अधिकार असणारी जिल्हा समिती गठित करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. वध्रेतील सर्वपक्षीय मोर्चातून शाळा व महाविद्यालयीन अभ्यासक्रमात स्त्री सन्मान व अधिकार तसेच अत्याचार प्रतिबंधक माहितीचा अंतर्भाव करण्याची मागणी झाली. मुलींनी कुठलाही त्रास पालकांजवळ अथवा शिक्षकांजवळ व्यक्त करण्याची शपथ घेतली. घटनेच्या निमित्ताने होत असलेले प्रबोधन समाजहिताचेच ठरणार आहे.