29 January 2020

News Flash

‘भिडे गुरुजींची इस्रोच्या अध्यक्षपदी नियुक्ती करा’; पंतप्रधान मोदींना पत्र

"भारताच्या उज्वल भविष्यासाठी ही नियुक्ती गरजेची आहे"

भिडे यांच्या नियुक्तीसाठी पंतप्रधान मोंदीना पत्र

अमेरिकेने एकादशीच्या दिवशी चांद्रयान सोडल्यानेच त्यांची चांद्रमोहीम यशस्वी झाली असं वक्तव्य शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजींनी सोमवारी केलं. यावरुनच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर सरचिटणीस परीक्षित तळोकार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून भिडे यांची इस्रोच्या प्रमुखपदी नियुक्ती करावी अशी मागणी केली आहे. तळोकार यांनाची हे पत्र फेसबुकवर पोस्ट केले आहे.

भारताची महत्त्वाकांक्षी चांद्रयान २ ही मोहीम अगदी शेवटच्या टप्प्यात चंद्राच्या भूपृष्ठापासून केवळ २.१ किलोमीटर अंतरावर असताना विक्रम लँडरचा इस्रोशी संपर्क तुटला. त्यामुळे सर्वच भारतीय हळहळले. मात्र त्याच वेळी संपूर्ण देश इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या पाठिशी उभा राहिल्याचे दिसले. असं असतानाच भिडे गुरुजींनी अमेरिकेने एकादशीच्या दिवशी चांद्रयान सोडल्याने ते यशस्वी झाल्याचे वक्तव्य केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. भिडे गुरुजींवर याच वक्तव्यावरुन आता त्यांना इस्रोचे प्रमुख बनवण्याची मागणी राष्ट्रवादीने पंतप्रधानांकडे केली आहे. तळोकार यांनी लिहिलेल्या पत्राचा विषय ‘अध्यात्मिक गुरु श्री मनोहर उर्फ संभाजी भिडे गुरुजी यांची इस्रोच्या प्रमुखपदी नेमणूक करण्याबाबत मागणी,’ असा आहे.

‘सांगलीतील जेष्ठ शास्त्रज्ञ श्री संभाजी भिडे गुरुजी यांची इस्रोच्या प्रमुखपदी तात्काळ नेमणूक करण्यासाठी हे पत्र लिहीत आहे,’ असं तळोकार यांनी पत्राच्या सुरुवातील म्हटले आहे. ‘काल भिडे गुरुजी यांनी ‘अमेरिकेनी त्यांच यान एकादशीला सोडल्यामुळे त्यांना यश आलं’ असं म्हटल्याचं वृत्त आहे. असं झाल्यास भारताच्या उज्वल भविष्यासाठी संभाजी भिडे गुरुजी यांची इस्रोच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात यावी. श्रीहरिकोटामधील सगळी सूत्र भिडे गुरुजींच्या हाती गेल्यास ते पंचांग बघून पुढचा कार्यक्रम ठरवतील आणि थोड्याच दिवसात भारताची इस्रो ही संस्था अमेरिकेच्या नासा या संस्थेपेक्षा अव्वल ठरेल,’ असं तळोकार यांनी पत्रात म्हटले आहे.

काय म्हणाले होते भिडे गुरुजी?

सोमवारी पुण्यामधील एका कार्यक्रमादरम्यान चांद्रयान मोहीमेबाबत भिडे गुरुजींना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी अमेरिकेची चांद्रयान मोहिम आणि एकादशीचा संबंध सांगणारे वक्तव्य केले. “भारतीय कालमापन पद्धतीला जगात तोड नाही. एक सेकंदाचा हजारावा भाग मोजण्याची पद्धतही भारतीय कालमापन पद्धतीत आहे. अमेरिकेने याच कालमापन पद्धतीचा उपयोग केला म्हणूनच अमेरिकेची चांद्रयान मोहीम यशस्वी झाली. अमेरिकेने आत्तापर्यंत ३८ वेळा चंद्रावर उपग्रह सोडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा प्रयत्न फसला. तेव्हा नासाच्या एका वैज्ञानिकाने भारतीय कालमापन पद्धतीचा अभ्यास केला आणि उपग्रह एकादशीच्या दिवशी सोडला. ज्यामुळे अमेरिकेची मोहीम यशस्वी झाली. एकादशीच्या दिवशी ब्रह्मांडातली स्थिती संतुलित असते. त्याचमुळे प्रयोग यशस्वी झाला” असंही संभाजी भिडे गुरुजी यांनी म्हटलं आहे.

First Published on September 11, 2019 12:49 pm

Web Title: appoint sambhaji bhide as isro chief letter by ncp to pm modi scsg 91
Next Stories
1 पुणे : पत्नीच्या छळाला कंटाळून पतीची आत्महत्या
2 राजीनाम्याचे दिल्लीत पडसाद : मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षांना सोनिया गांधींनी बोलावलं
3 पायवाट मोडली; बीडमध्ये सासूच्या पार्थिवाला चौघींनी दिला खांदा
Just Now!
X