दौंड-मनमाड रेल्वेमार्गावर राहुरी ते कोपरगाव दरम्यान दहा उड्डाणपुलांना रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खारगे यांनी मंजुरी दिली असल्याची माहिती खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी दिली. पुलाच्या कामासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे असे ते म्हणाले.
यासंदर्भात माहिती देताना खासदार वाकचौरे म्हणाले, रेल्वेरुळामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी रस्ता वाहतूक विस्कळीत होते. अनेक ठिकाणी हा मार्ग राज्यमार्गांना छेदतो. त्यामुळे अशा ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती. यासंदर्भात रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खारगे यांच्याकडे पुलांना मंजुरी देण्याची मागणी केली. त्यानुसार पुणतांबे-श्रीरामपूर रस्त्यावरील रेल्वेचौकी (खर्च २० कोटी), कोपरगाव-पढेगाव रस्त्यावरील शिंगणापूर चौकी (२० कोटी), शिर्डी-शिंगणापूर रस्त्यावर पढेगाव रस्त्यावरील चौकी (२० कोटी), चितळी चौकी (२८ कोटी), वळदगाव-उंबरगाव रस्त्यावरील अशोकनगर चौकी (२० कोटी), कोपरगाव येथील भोजडे चौकी (२० कोटी), वांबोरी येथील मिरीरोडवरील चौकी (१४ कोटी), राहुरी येथील मांजरी रोडवरील चौकी (१२ कोटी), टाकळीमियाँ-निंभारी रोडवरील चौकी (१० कोटी), बेलापूर-माहेगाव रोडवरील लाख चौकी (१० कोटी) या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यासाठी रेल्वे खात्याने मंजुरी दिली आहे. त्यातील पुणतांबे व राहुरी येथील दोन पुलांसाठी रेल्वे खाते काही प्रमाणात खर्च करणार असून बाकी आठ पुलांचा खर्च पूर्णपणे राज्य शासनाने करावयाचा आहे.
रेल्वे खात्याने तांत्रिक मंजुरी दिली असली तरी खर्च राज्य शासनाने करावयाचा असल्याने निधीशिवाय हे काम सुरू होऊ शकणार नाही. म्हणून या उड्डाणपुलांसाठी राज्य शासनाने लवकरात लवकर खर्चास मंजुरी द्यावी यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पत्र देऊन मागणी केल्याची माहिती वाकचौरे यांनी दिली.