सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात देशभरात आंदोलनं सुरु असताना महाराष्ट्रातही समाजातील सर्व प्रकारचे लोक या कायद्याविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. दुसरीकडे केंद्र सरकारने सातत्याने या कायद्याचे समर्थन केले आहे. या पार्श्वभूमीवर एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर सडकून टीका केली आहे. “या देशात फक्त दोनच लोकांना अक्कल आहे का? बाकीचे बिनडोक आहेत का?” असे त्यांनी म्हटले आहे.

जलील म्हणाले, केंद्र सरकारने आणलेला हा कायदा मुस्लिमांच्या आणि संविधानाच्या विरोधातला आहे. त्यामुळेच या कायद्याला विरोध करण्यासाठी देशभरातील आंदोलनांमध्ये केवळ मुस्लिमच नव्हे तर आमचे हिंदू बांधव, मानवाधिकार कार्यकर्ते, विद्यार्थी, बुद्धिजीवी लोक, संविधानप्रेमी लोक सहभागी झाले आहेत.

अशा प्रकारे समाजातील विविध धर्मीय आणि बुद्धीजीवी लोक या कायद्याला विरोध करीत असताना मोदी आणि शाह मात्र याचे समर्थन करीत आहेत. त्यामुळे या देशात केवळ दोन लोकांनाच अक्कल आहे आणि बाकीचे बिनडोक आहेत का? अशा शब्दांत त्यांनी मोदी-शाह यांच्यावर टीका केली. एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.

दरम्यान, आज औरंगाबादमध्ये एमआयएम पक्षाच्यावतीने आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. “हा मोर्चा शांततेत काढण्यात येणार आहे. यामध्ये कोणत्याही पक्षाचा झेंडा नसेल तसेच कोणतेही भाषण केले जाणार नाही. यासाठी सर्व जाती-धर्माच्या लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे. यावेळी सर्वांच्या हातात तिरंगा झेंडा असेल त्याचबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं संविधान असणार आहे. याद्वारे आम्हाला सरकारला हे दाखवून द्यायचं आहे की, तुमचं सरकार देशात आलं असलं तरी संविधानावर हा देश चालणार आहे.” असे जलील यांनी मोर्चाबाबत सांगताना स्पष्ट केले.