महाराष्ट्रात दोन सत्ताकेंद्रं आहेत का? हा प्रश्न विचारला असता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. महाराष्ट्रात दोन सत्ताकेंद्र नसून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच सर्वाधिकारी आहेत असं उत्तर संजय राऊत यांनी दिलं आहे. कोणतीही फाईल ही यशवंतराव चव्हाण सेंटर या ठिकाणी म्हणजेच शरद पवार यांच्याकडे जात नाही. मुख्यमंत्र्यांकडे सर्वाधिकार आहेत असं त्यांनी स्पष्ट केलं. तसंच शरद पवार यांनी हे सरकार अस्तित्त्वात आणलं आहे. ते या सरकारचा एक महत्त्वाचा भाग आहेत. शरद पवारांकडे जाऊन कुणी मार्गदर्शन घेत असेल तर त्यात गैर काय? असाही प्रश्न त्यांनी विचारला.

शरद पवार हे राजकारण आणि प्रशासन यातला प्रदीर्घ अनुभव असलेले नेते आहेत. त्यांचं मार्गदर्शन आम्ही नेहमीच घेत असतो. त्यांच्या इतका अनुभव असलेला नेता सध्या दुसरा कुणीही नाही. अशा सगळ्या स्थितीत महाविकास आघाडीचं जे सरकार अस्तित्त्वात आलं ते शरद पवार यांच्या पुढाकारामुळे आलं. त्यामुळे त्यांचा सल्ला हा मोलाचा आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. एबीपी माझा या वृत्त वाहिनीच्या ‘माझा कट्टा’ या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाची आम्हाला गरज लागत असतेच असंही त्यांनी स्पष्ट केलं.

एवढंच नाही तर याच कार्यक्रमात त्यांनी इतरही मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. सुशांत सिंह प्रकरणाचं राजकारण भाजपाकडून जाणीवपूर्वक केलं जातं आहे. या प्रकरणाचा फायदा बिहार निवडणुकीसाठी करण्यात येतो आहे. असाही आरोप संजय राऊत यांनी केला आहे. एवढंच नाही तर पार्थ पवार प्रकरणावरही त्यांनी भाष्य केलं. आजोबांनी नातवाला सल्ला दिलाय, हा त्यांच्या घरातला प्रश्न आहे. अशाच प्रकारे बाळासाहेब आम्हालाही रागवायचे त्यावेळी आम्हाला बरं वाटायचं म्हणजे आम्हाला हे वाटायचं की बाळासाहेब ठाकरे आमच्यावर चिडले म्हणजे त्यांचं आपल्याकडे लक्ष आहे. शरद पवार यांना कॅमेरासमोर चिडताना पाहिलेलं नाही. मात्र त्यादिवशी ते बोलून गेले.. पण तो त्यांच्या घरातला प्रश्न आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.