जालना मतदारसंघावरून सेना-भाजप आमनेसामने

औरंगाबाद : भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार असेल, असे सांगत जालना लोकसभा मतदारसंघात शिवसेना पाय रोवून उभारेल, असे गुरुवारी स्पष्टपणे सांगण्यात आले. ‘‘अर्जुना’च्या हाती धनुष्यबाण असेल आणि त्याने मारलेल्या बाणामुळे ‘दानवा’चा वध होईल, असे वक्तव्य राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले. खोतकर यांच्या या वक्तव्यामुळे जालना लोकसभा मतदारसंघात दानवे यांच्या विरोधात अर्जुन खोतकर तयारीला लागले असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. अशी लढत व्हावी, ही काँग्रेसच्याही नेत्यांची इच्छा असल्याचे दिसून आले होते. काँग्रेस जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांनी रावसाहेब दानवे यांच्या विरोधात आपण खोतकरांना सर्व ते सहकार्य करू, असे जाहीरपणे म्हटले होते.

जालना लोकसभा मतदारसंघावर खासदार रावसाहेब दानवे यांचा पगडा आहे. भाषेचा ग्रामीण बाज आणि लोकात मिसळण्याची हातोटी यामुळे  लोकसभा आणि विधानसभेत सहा वेळा खासदार दानवे निवडून आले आहेत. महाजन-मुंडे यांचे भाजप पक्षसंघटनेवर वर्चस्व असताना दानवे यांच्याकडे महत्त्वाच्या जबाबदाऱ्या नव्हत्या. त्यानंतर दानवे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद आले आणि त्यांनी मराठवाडय़ात ‘त्यांच्या’ पद्धतीने कारभार सुरू केला. दानवे यांचे हे वर्चस्व रोखण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते जालना लोकसभा मतदारसंघात काहीसे एकवटले आहेत. राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या मागे अन्य सर्वजण आहेत, असे संदेश देणारे कार्यक्रम घडवून आणण्यात आले. यात काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष तथा आमदार अब्दुल सत्तार यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. या पाश्र्वभूमीवर शिवसेनेच्या बैठकीत खोतकर कोणती भूमिका मांडतात, याकडे लक्ष होते. जालना जिल्हा लोकसभा मतदारसंघाचा शिवसेना पक्षप्रमुख आढावा घेत असताना आणि त्यानंतर खोतकर यांनी माध्यमांसमोर जालन्यात धनुष्यबाणाचाच उमेदवार असेल, असे जाहीर केले. अर्जुनाच्या हाती बाण असेल तर दानवाचा वध होईल, असे म्हणत त्यांनी आपण उमेदवार असल्याचे अप्रत्यक्षपणे सांगून टाकले.

धनुष्यबाण घेण्याची ताकद नाही – रावसाहेब दानवे

मुंबई: अर्जुन खोतकर यांचे डोळे कॉंग्रेसकडे लागले आहेत. धनुष्यबाण हाती घेण्याची ताकद त्यांच्यात उरलेली नाही. त्यामुळे खोतकरांनी धनुष्यबाणाची भाषा करू नये, असा प्रतिहल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी चढवला. लोकसभा निवडणुकीत अर्जुनाच्या हाती बाण आला की दानवांचा वध होईल, अशी तिखट टीका शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी रावसाहेब दानवेंवर केली. तसेच जालना मतदारसंघातून दानवेंच्या विरोधात लढण्यास सज्ज असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना रावसाहेब दानवे यांनी खोतकर यांच्यावर प्रतिहल्ला चढवला.