16 January 2019

News Flash

भुजबळांच्या मालमत्तेवर टांच

‘आर्मस्ट्राँग’च्या थकीत कर्जामुळे ४२५० चौरस मीटरचा भूखंड ताब्यात

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ हे येत्या १० जूनला पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित ‘हल्लाबोल’ आंदोलनाच्या समारोपाला उपस्थित राहून कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याची माहिती माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

‘आर्मस्ट्राँग’च्या थकीत कर्जामुळे ४२५० चौरस मीटरचा भूखंड ताब्यात

माजी खासदार समीर भुजबळ आणि विद्यमान आमदार पंकज भुजबळ संचालक असलेल्या आर्मस्ट्राँग इन्स्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडकडे दी नाशिक र्मचट्स बँकेकडून घेतलेले चार कोटी ३४ लाख ४३ हजार रुपयांचे कर्ज थकीत आहे. कर्जाच्या वसुलीसाठी भुजबळ कुटुंबियांच्या मालकीचा ४२५० चौरस मीटर भूखंड बँकेने ताब्यात घेतला आहे.

बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासह माजी खासदार समीर भुजबळ यांच्यावर सक्तवसुली संचलनालयाने कारवाई केल्यापासून काका-पुतणे कारागृहात आहेत. तपासात भुजबळ कुटुंबियांच्या मालमत्तेने तपास यंत्रणाही चक्रावल्या होत्या. वेगवेगळ्या प्रकरणात स्वतंत्रपणे गुन्हे दाखल असल्याने संबंधितांना अद्याप जामीन मिळालेला नाही. काँग्रेस आघाडीच्या कार्यकाळात आणि निवडणुकीचा अर्ज भरताना भुजबळ कुटुंबियांचे ऐश्वर्य  झळाळून उठत असे. बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणात अटक झाल्यानंतर भुजबळ कुटुंबियांशी संबंधित अनेक मालमत्ता तपास यंत्रणांनी गोठविल्या आहेत. उपरोक्त मालमत्तांच्या स्त्रोतांची शहानिशा केली जात आहे. या घडामोडीत इतर मालमत्ता थकीत कर्जामुळे गमावण्याची वेळ आल्याचे चित्र आहे.

भुजबळ कुटुंबियांनी वेगवेगळ्या नावाने अनेक कंपन्या स्थापन केल्याचे आधीच उघड झाले आहे. त्यातील एक म्हणजे आर्मस्ट्राँग इन्स्फ्रास्ट्रक्चर. माजी खासदार समीर भुजबळ, आ. पंकज भुजबळ आणि सत्यन केसरकर हे या कंपनीचे संचालक. या कंपनीने नाशिक र्मचट्स सहकारी बँकेकडून कर्ज घेतले होते. या कर्जासाठी संबंधितांनी नाशिक शिवारातील ४२५० चौरस मीटरचा बिनशेती भूखंड, ज्यावर ६०.४७ चौरस मीटर बांधकाम केलेले आहे, तो गहाण ठेवला होता. हे कर्ज कंपनीला भरता आले नाही. थकबाकीची ही रक्कम चार कोटी ३४ लाख ४३ हजार १८३ रुपयांवर पोहोचल्याचे बँकेने म्हटले आहे. थकीत कर्जाच्या वसुलीसाठी शेफाली भुजबळ, विशाखा भुजबळ यांच्या ताब्यात असणारा हा भूखंड बँकेने जप्त केला आहे. सोमवारी ही कारवाई करण्यात आली. या मालमत्तेशी संबंधित कोणीही कोणताही व्यवहार करू नये असे बँकेने जाहीर नोटीसीद्वारे म्हटले आहे. कंपनीने थकीत कर्जाची संपूर्ण रक्कम व्याजासह भरण्यास बँकेने दोन महिन्यांची मुदत दिली आहे. या कालावधीत उपरोक्त रक्कम न मिळाल्यास बँकेमार्फत या मालमत्तेची विक्री करून वसुली केली जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

एैश्वर्यसंपन्नता ते थकीत कर्ज

काँग्रेस आघाडीच्या सत्ताकाळात भुजबळ यांच्या आर्मस्ट्राँग कंपनीने दाभाडीस्थित बंद पडलेला गिरणा सहकारी कारखाना अत्यल्प किंमतीत खरेदी केला होता. या कारखान्याची सुमारे ३०० एकर जागा असून तिची किंमत कोटय़वधींच्या घरात असल्याचा आक्षेप सभासदांसह मालेगावकरांनी नोंदविला होता. नाशिक शहरातील भुजबळ फार्म परिसरात भुजबळ कुटुंबियांनी अलिशान महालाची उभारणी केली. या महालाचे दर्शन केवळ भुजबळांच्या निकटवर्तीयांना झाले होते. बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांचे भुजबळ यांच्या घरातील एैश्वर्याने डोळे दिपले होते. महागडय़ा सामग्रीचे मूल्यमापन करण्यासाठी त्यांना त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत घेण्याची वेळ आली. सत्तेत असताना समृध्द असणाऱ्या भुजबळ कुटुंबियांच्या मागे आता बँकेचा ससेमिरा लागल्याचे उघड झाले आहे.

First Published on April 12, 2018 1:38 am

Web Title: armstrong infrastructure private limited chhagan bhujbal