santosh_mahadikकुपवाडा जिल्ह्यतील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर हाजी नाका परिसरातील दाट जंगलात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराच्या ४१ राष्ट्रीय रायफल्सचे कर्नल संतोष महाडिक (३९) शहीद झाले. तर एक पोलीस जखमी झाला. महाडिक हे मूळचे सातारा जिल्ह्यातील पोगरवाडी गावचे रहिवासी आहेत. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.
दाट जंगलाच्या परिसरात दहशतवादी लपून बसले असल्याची खबर मिळाल्यानंतर शोधमोहिम हाती घेण्यात आली होती. तिचे नेतृत्त्व कर्नल संतोष महाडिक करीत होते. दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र तेथे त्यांना वीरगती प्राप्त झाली. महाडिक यांचे प्राथमिक शिक्षण सातारा येथील सैनिक स्कूलमध्ये तर महाविद्यालयीन शिक्षण यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयात झाले. १९९८ मध्ये ते लष्करात विशेष दलात दाखल झाले आणि अतुलनीय शौर्याबद्दल त्यांना सेना पदकाने गौरविण्यात आले होते.