रक्षाबंधन साजरा केल्यानंतर रांची येथे सैन्यात कर्तव्यावर निघालेल्या जवानाचा हिंगोलीनजीक झालेल्या रेल्वे अपघातात मृत्यू झाला. प्रवीण शिवाजी गायकवाड (वय २३) असे मृत जवानाचे नाव आहे. परभणी जिल्ह्यातील पिंपळदरी येथील प्रवीण गायकवाड रांची येथील महार रेजिमेंटमध्ये कार्यरत होते. ३० जुलैपासून ते एक महिन्याच्या सुट्टीवर गावी आले होते. रक्षाबंधनाचा कार्यक्रम आटोपून रविवारी दुपारी ते कर्तव्यावर हजर होण्यासाठी निघाले असताना रात्री ७.३० वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृतदेह हिंगोली-वाशिम रेल्वेमार्गावर अंधरवाडी शिवारात रेल्वे रूळाच्या बाजूला आढळून आला.

त्यांच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली होती तर हात तुटलेल्या अवस्थेत होते. तसेच चेहऱ्यावरही गंभीर जखमा झाल्याचे ट्रॅक मन चंदनकुमार दास यांना दिसून आले. मृतदेह पाहिल्यानंतर दास यांनी तातडीने रेल्वे पोलीस हिंगोली ग्रामीण पोलिसांना कळवलं. ग्रामीण ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजू ठोके, जमादार रविकांत हराळ यांनी घटनास्थळी धाव घेतली.

रात्री उशिरा जवान गायकवाड यांचा मृतदेह शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला. प्रवीण गायकवाड यांचा रेल्वेतून पडल्याने मृत्यू झाला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. तीन वर्षांपूर्वी गायकवाड सैन्यात भरती झाले होते. रविवारी दुपारी ४ वाजेपर्यंत ते व्हॉटसअपवर ऑनलाइन होते. रविवारी सकाळी रक्षाबंधनाचा कार्यक्रम आटोपून ते कर्तव्यावर जाण्यासाठी निघाले होते, असे त्यांचे भाऊ बंडू गायकवाड यांनी भ्रमणध्वणीवरून बोलतांना सांगितले. त्यांच्या पश्चात आई-वडील, दोन बहिणी व एक भाऊ असा परिवार असून, ग्रामीण पोलीस ठाण्याचे जमादार शिवा पोले यांनी घटनेचा पंचनामा केल्यानंतर या घटनेची माहिती रांची येथे सैन्याच्या कार्यालयात दिली आहे. पोलिसांनी सोमवारी पहाटे प्रवीण गायकवाड यांच्या अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे