प्रशिक्षणार्थी लष्करी अधिकाऱ्याविरुध्द गुन्हा दाखल केल्यामुळे संतप्त झालेल्या तोफखाना केंद्रातील १०० ते १५० प्रशिक्षणार्थी जवानांनी बुधवारी दुपारी शहरातील उपनगर पोलीस ठाण्यावर थेट हल्ला चढवला. पोलीस ठाण्याची तोडफोड करत काही कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली. धुडगूस घातल्यावर जवान पोलीस ठाण्यास टाळे ठोकून निघून गेले. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून गुन्हा दाखल करत पोलिसांनी संशयितांची धरपकड सुरू केली आहे.
शहरातून जाणाऱ्या नाशिक-पुणे रस्त्यावर उपनगर पोलीस ठाणे आहे. त्याच्या मागील बाजूस तोफखाना दलाचे केंद्र आहे. मंगळवारी रात्री या केंद्रातील प्रशिक्षणार्थी अधिकारी आशिष बागुल हा भाजपचा पदाधिकारी जयंत नारद सोबत तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आला होता. यावेळी प्रवेशद्वारासमोर उभ्या केलेल्या मोटारीवरुन संबंधितांना पोलीस अधिकाऱ्याने सूचना केली. तेव्हा बागुलने अरेरावीची भाषा केली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली. या प्रकरणी दोघांविरुध्द शासकीय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
उभयतांना अटक करून बागुलला लष्कराच्या ताब्यात देण्यात आले होते.
बुधवारी या घटनेला वेगळे वळण मिळाले. दुपारी बाराच्या सुमारास साध्या वेशातील १०० ते १५० लष्करी जवानांनी उपनगर पोलीस ठाण्यावर धडक दिली. समोर दिसेल ते सामान तोडण्यास सुरुवात केली. दूरचित्रवाणी संच, संगणक आदी वस्तुंची तोडफोड करत गुन्हा नोंदविली जाणारी पुस्तिका व इतर कागदपत्रे फाडली. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे पोलीस ठाण्यात एकच गोंधळ उडाला. काही कर्मचाऱ्यांनी बाहेर पलायन केले.
 जवानांच्या तावडीत काही कर्मचारी सापडले. त्यांनाही जवानांनी सोडले नाही. पोलीस ठाण्याबाहेर उभी असणारी वाहने आणि इमारतीच्या काचाही फोडण्यात आल्या. जवळपास २० ते २५ मिनिटे जवानांचा धुडगूस सुरू होता. काही कर्मचाऱ्यांना आतमध्ये डांबून पोलीस ठाण्यास टाळे ठोकत जवान निघून गेले. या घटनेची माहिती समजल्यानंतर धडक कारवाई दलासह पोलीस कुमक रवाना करण्यात आली. वरिष्ठ पोलीस आणि तोफखाना केंद्रातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.