काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्य़ात दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलेले जवान शंकर शिंदे यांच्या पार्थिवावर सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता चांदवड तालुक्यातील भयाळे या त्यांच्या गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शनिवारी कुपवाडय़ात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये तब्बल १८ तास चाललेल्या चकमकीत पाच दहशतवादी ठार झाले. तर, दोन जवान शहीद झाले. त्यातील एक भयाळे येथील शंकर चंद्रभान शिंदे (३५) होय. शिंदे यांचे पार्थिव सायंकाळी सहाच्या सुमारास ओझर येथील एचएएलच्या विमानतळावर मुंबईहून विशेष विमानाने आणण्यात आले. विमानतळावर लष्कराच्या वतीने पार्थिवास मानवंदना देण्यात आली. त्यानंतर त्यांचे पार्थिव मूळगावी दाखल झाले. शिंदे यांच्या निधनाने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. शंकर शिंदे अमर रहेच्या घोषणा देत उपस्थित नागरिकांनी साश्रुनयनांनी आपल्या शूर वीरास निरोप दिला.
सुमारे १४०० लोकसंख्या असलेल्या भयाळे या गावातील ८० पेक्षा अधिक जवान सैनिक आहेत. शंकर शिंदे यांना वीरमरण आल्याचे वृत्त भयाळे येथे आल्यावर संपूर्ण गावावर शोककळा पसरली. शिंदे यांच्या पश्चात आई सुमनबाई, वडील चंद्रभान, पत्नी सुवर्णा, सहा वर्षांची मुलगी वैष्णवी व दीड वर्षांचा ओम यांच्यासह वडील बंधू, दोन बहिणी असा परिवार आहे. शिंदे हे १७ वर्षांपासून सैन्यदलात होते. एकत्र कुटुंब पद्धतीत वाढलेले शिंदे हे मनमिळावू आणि समंजस स्वभावामुळे गावातील सर्वानाच आपलेसे वाटत. त्यामुळे शिंदे यांच्या वीरमरणाने प्रत्येक जण हळहळत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 15, 2016 12:23 pm