News Flash

लष्करी अधिकाऱ्यांच्या पत्नींचा लढा निर्णायक वळणावर

लष्करी अधिकारी व जवानांचे नाहक जाणारे बळी रोखण्यासाठी अधिकाऱ्यांच्या पत्नींनी कालबाह्य़ व सदोष लष्करी सामग्रीचा वापर थांबविण्यासाठी सुरू केलेली लढाई निर्णायक वळणावर आली आहे.

| March 8, 2015 05:05 am

लष्करी अधिकारी व जवानांचे नाहक जाणारे बळी रोखण्यासाठी अधिकाऱ्यांच्या पत्नींनी कालबाह्य़ व सदोष लष्करी सामग्रीचा वापर थांबविण्यासाठी सुरू केलेली लढाई निर्णायक वळणावर आली आहे. जवळपास चार महिन्यांच्या पाठपुराव्यानंतर लष्करी अधिकाऱ्यांच्या पत्नींच्या गटाला बुधवार, ११ मार्चला संरक्षणमंत्री mu01मनोहर पर्रिकर यांच्यासमोर आपली व्यथा मांडण्याची संधी मिळणार आहे. मिग २१ विमानाप्रमाणे अपघातांच्या मालिकेत सापडलेल्या लष्कराच्या चिता व चेतक हेलिकॉप्टर्सचा वापर त्वरित थांबवावा, अशी आग्रही मागणी हे शिष्टमंडळ करणार आहे.
कालबाह्य़ लष्करी सामग्रीविरोधात लष्करी अधिकाऱ्यांच्या पत्नींनी पुकारलेल्या एल्गारावर ‘लोकसत्ता’ने प्रकाशझोत टाकला होता. पाच महिन्यांपूर्वी लष्कराचे चिता हेलिकॉप्टर बरेली येथे अपघातग्रस्त होऊन त्यात दोन वैमानिकांसह तीन जणांना प्राण गमवावे लागले होते. याआधी मागील चार वर्षांत चिता व चेतक हेलिकॉप्टर्सचे १४ हून अधिक अपघात झाले आहेत. त्यामध्ये १७ हून अधिक जणांना प्राण गमवावे लागले. बरेलीच्या घटनेनंतर लष्करी हवाई दलासह इतर विभागांत कार्यरत अधिकाऱ्यांच्या पत्नींनी एकत्र येऊन कालबाह्य़ हेलिकॉप्टर्सचे गांभीर्य केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून देण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय लष्करातील अंतर्गत बाबींवर अधिकारी व जवानांना फारसे बोलता येत नाही. त्यामुळे जुनाट लष्करी सामग्री जिवावर बेतत असली तरी त्याविरोधात त्यांना उघड मतही मांडता येत नाही. आपल्या जिवावर उदार होऊन देशाचे रक्षण करणाऱ्यांचे नाहक बळी थांबविण्यासाठी लष्करी अधिकाऱ्यांच्या पत्नींनी या माध्यमातून पुढाकार घेतला .
लष्कराच्या ताफ्यात जवळपास १७५ चिता व चेतक हेलिकॉप्टर्स असून ती ३५ ते ४० वर्षे जुनी आहेत. त्यांचे आयुर्मान कधीच संपुष्टात आले आहे. तरीदेखील या धोकादायक हेलिकॉप्टर्सचा वापर केला जात असून त्यास पत्नींच्या गटाचा आक्षेप आहे. कालबाह्य़ लष्करी सामग्रीचा विषय तातडीने मार्गी लावण्यासाठी संबंधितांनी पंतप्रधान, संरक्षणमंत्र्यांना आधी निवेदन पाठविले होते. या विषयाचे गांभीर्य निदर्शनास आणून देण्यासाठी संरक्षणमंत्र्यांची भेट मिळावी म्हणून त्यांचा पाठपुरावा सुरू होता. अमेरिकेचे अध्यक्ष ओबामा यांच्या भारतदौऱ्यानंतर वेळ देण्याचे संरक्षण मंत्रालयाने संबंधितांना कळविले होते. त्यानुसार ११ मार्चला संरक्षणमंत्र्यांशी चर्चा होणार आहे.
अ‍ॅड. मीनल वाघ-भोसले यांच्या नेतृत्वाखाली हा गट दिल्ली येथे त्यांची भेट घेणार आहे.

*लष्कराच्या हवाई दल ताफ्यातील जुनाट हेलिकॉप्टर्सचे अपघात वाढत आहेत. त्यांच्या जागी नवीन हेलिकॉप्टर्स घेण्याचा विषय प्रदीर्घ काळापासून रखडला आहे. परिणामी, कालबाह्य़ हेलिकॉप्टर्सचा वापर करून वैमानिकांचा जीव धोक्यात घातला जात आहे. हे अपघात रोखण्यासाठी तातडीने चिता व चेतकचा वापर कायमस्वरूपी थांबविणे हा उपाय आहे.
– अ‍ॅड. मीनल वाघ-भोसले (लष्करी अधिकाऱ्याची पत्नी)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 8, 2015 5:05 am

Web Title: army officers wives to meet defence minister
टॅग : Defence Minister
Next Stories
1 कोल्हापूरमध्ये कारखान्याची जाळपोळ
2 कंत्राटदाराला मुदतवाढीवरून युतीत वाद
3 ताडोबात व्याघ्रदर्शनासाठी आता महिला मार्गदर्शकही!
Just Now!
X