राष्ट्रसेवेमध्ये आदराने आणि शौर्याने सहभागी होण्यासाठी राज्यातील तरुणांना लष्करात भरती होण्याची संधी मिळणार आहे. यासाठी १ ते ११ नोव्हेंबर १०१७ या कालावधीत सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन केले आहे. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, नाशिक, रायगड आणि पालघर जिल्ह्यातल्या इच्छूक उमेदवारांसाठी मुंब्र्यातील अब्दुल कलाम आझाद क्रीडा मैदान येथे ही भरती प्रक्रीया होणार आहे. इच्छूक उमेदवारांनी http://www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी करावी, असे आवाहन लष्कराकडून करण्यात आले आहे.

लष्कराचा पुणे विभाग, महाराष्ट्राचे व्यवस्थापकीय मुख्यालय क्षेत्र आणि गोवा तसेच गुजरात उपविभाग यांच्यासाठी ही भरती केली जाणार आहे. लष्करामध्ये भरती होऊ इच्छिणाऱ्यांनी ऑनलाईन नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. ही नाव नोंदणी प्रक्रिया साधारणपणे १ किंवा २ सप्टेंबर २०१७ पासून सुरू होणार असून १६ ऑक्टोबर २०१७ पर्यंत चालू राहणार आहे. सैन्य भरती मेळाव्याची प्रक्रिया सुलभतेने पार पडावी यासाठी आधी ऑनलाईन नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर १७ ऑक्टोबर २०१७ पासून भरती मेळाव्यासाठी उमेदवारांना प्रवेशपत्र देण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्जावर नमूद केलेल्या ई-मेल पत्त्यावर प्रवेशपत्र उमेदवारांना पाठवली जाणार आहेत. प्रवेशपत्र डाऊनलोड करून भरती मेळाव्याला उपस्थित राहताना ते सोबत बाळगणे आवश्यक आहे.

सैन्य भरतीची प्रक्रिया संपूर्णपणे पारदर्शक आहे. या मेळाव्याचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येणार आहे. तसेच सैन्यभरती पूर्णपणे मोफत आहे. मेळाव्याच्या कालावधीत दरदिवशी अंदाजे पाच ते सहा हजार उमेदवार उपस्थित राहतात. त्यामुळे होणारा गोंधळ आणि गैरसोय टाळण्यासाठी नियोजित कालावधीत ऑनलाईन अर्ज भरावेत असे आवाहन संबंधित विभागाने केले आहे.

[jwplayer UCEBhfh9]