News Flash

अर्णब गोस्वामी अटक : “या घटनेनंतर तीन संकेत मिळतात ते म्हणजे…”

''तेव्हा शिवसेनेनं त्याचं समर्थन केलं होतं"

पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर अर्णब गोस्वामी. (Express photo by Narendra Vasker)

रिपब्लिकन वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली. या कारवाईनंतर राज्यात सत्ताधारी विरुद्ध विरोधक अशी चकमक झडताना दिसत आहे. अर्णब गोस्वामी यांना अटक झाल्यानंतर भाजपा आक्रमक झाल्याचं दिसत आहे. गोस्वामी यांना झालेल्या अटकेचा भाजपानं निषेध करत ठाकरे सरकारवर टीकेचा प्रहार केला आहे. ”राज्य सरकारनं ‘रिपब्लिक’चे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावर सूडबुद्धीनं केलेल्या कारवाईचा भाजपा तीव्र निषेध करते. १९७५ च्या आणीबाणीची केवळ समर्थक असलेली शिवसेना आज गांधी परिवाराच्या दबावाखाली येऊन आणीबाणीची व्यवस्थापक बनली आहे,” अशी टीका भाजपा नेते आमदार आशीष शेलार यांनी बुधवारी केली.

अर्णब गोस्वामी यांना अटक झाल्यानंतर भाजपाच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत शेलार यांनी संवाद साधला. यावेळी भाजपा मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये उपस्थित होते. शेलार म्हणाले, ”नियतीचं कालचक्र कसं असतं ते आजच्या अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या घटनेवरून स्पष्ट झालं आहे. १९७४ साली इंदिरा गांधी यांच्या काँग्रेसने देशात आणीबाणी जाहीर केली, तेव्हा शिवसेनेनं त्याचं समर्थन केलं होतं. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या शिवसेनेनं सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या दबावाखाली येऊन सूडबुद्धीनं कारवाई करत आणीबाणीचे जणू व्यवस्थापनच केल्याचे चित्र आहे. संविधानरक्षण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यासंदर्भात वेळोवेळी आवाज उठवणारे सर्वजण आज मात्र गप्प बसले आहेत,” अशी टीका शेलार यांनी केली.

“महाविकास आघाडी सरकारनं ही कारवाई केवळ गांधी परिवाराच्या आदेशानुसार केली आहे. या घटनेनंतर तीन संकेत मिळतात ते म्हणजे गांधी परिवाराला आणि ठाकरे परिवाराला कोणी प्रश्न विचारायचे नाहीत कारण ही राजघराणी आहेत. त्यांना अडचणीत आणणारे प्रश्न विचारले, तर कारवाई केली जाईल. ठाकरे परिवाराच्या हिंदुत्वाला अडचणीत आणणारे प्रश्न माध्यमांनी विचारू नयेत. हिंदुत्वाविषयी आणि देशहितासंदर्भात जे-जे पत्रकार प्रश्न विचारतील, त्या सर्व पत्रकारांवर अशीच कारवाई केली जाईल, यांचे संकेत या घटनेतून मिळतात. महाविकास आघाडी सरकारच्या कालखंडात आतापर्यंत ५७ पत्रकारांवर केसेस दाखल केल्या गेल्या आहेत. तसेच सरकारविरोधात जे कोणी सामान्य व्यक्ती बोलत आहेत, त्यांच्यावरही कारवाई केली जात आहे,” असा धक्कादायक आरोप शेलार यांनी केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2020 4:08 pm

Web Title: arnab goswami arrest bjp ashish shelar uddhav thackeray maharashtra govt bmh 90
Next Stories
1 ही पाहा अन्वय नाईक यांची Suicide Note; काँग्रेसचे ट्विट
2 पोलिसांनी मला मारलं -अर्णब गोस्वामी
3 “पोलिसांनी उचलून मला बाजूला फेकलं,” अर्णब गोस्वामींना भेटायला गेलेल्या किरीट सोमय्यांचा आरोप
Just Now!
X