News Flash

राज्यपालांना अर्णब गोस्वामींच्या प्रकृती व सुरक्षेची काळजी; गृहमंत्र्यांशी केली चर्चा

कुटुंबीयांना भेटण्याची परवानगी देण्याबाबत केली सूचना

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी सध्या अटकेत असलेले रिपब्लिकन वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना तळोजा कारागृहात ठेवण्यात आलं आहे. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना तुरूंगात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान, या प्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी चर्चा केली आहे. अर्णब गोस्वामी यांच्या प्रकृती व सुरक्षेबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी चिंता व्यक्त केली आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. रिपब्लिक मीडिया नेटवर्कचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या सुरक्षा व आरोग्याबाबत आपली चिंता व्यक्त केली. अर्णब गोस्वामी यांच्या कुटुंबीयांना त्यांना भेटू देण्याची तसेच त्यांच्याशी बोलू देण्याची अनुमती द्यावी, अशी सूचनाही राज्यपालांनी गृहमंत्र्यांना केली आहे.

मूळ प्रकरणावर एक नजर…

मूळच्या अलिबागमधील कावीर येथील अन्वय नाईक यांचा मुंबईत ‘कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेड’ नावाचा वास्तुसजावटीचा व्यवसाय होता. ते ४ मे २०१८ रोजी कावीर येथील निवासस्थानी आले होते. दुसऱ्याच दिवशी (५ मे) अन्वय यांच्यासह आई कुमूद यांचा मृतदेह नोकरांना घरात आढळला. पोलिसांना तिथे आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली. अर्णब गोस्वामी, ‘आयकास्ट स्काय मीडिया’चे फिरोज शेख, ‘स्मार्टवर्क्‍स’चे नीतेश सारडा या तिघांनी पैसे थकवल्याने आपण आत्महत्या करत असल्याचे अन्वय यांनी या चिठ्ठीत नमूद केले होते.

त्यांच्या पत्नी अक्षता यांच्या तक्रारीवरून या तिघांविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. तपासात काहीही निष्पन्न झालेले नसल्याचा अहवाल पोलिसांनी न्यायालयात सादर केल्यानंतर तपास बंद करण्यात आला. मात्र या प्रकरणाचा तपास पुन्हा करण्याची विनंती अन्वय यांची पत्नी आणि मुलीने राज्य सरकारकडे केली होती. त्यानंतर या प्रकरणाच्या फेरतपासाचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 9, 2020 1:00 pm

Web Title: arnab goswami arrest governor bs koshyari spoke to home minister anil deshmukh concern over the security and health bmh 90
Next Stories
1 अर्णबच्या केसालाही धक्का लागला तर…राम कदमांचा ठाकरे सरकारला इशारा
2 अलका कुबल यांनी घेतली उदयनराजे यांची भेट; प्राजक्ता गायकवाडशीही केली चर्चा
3 चुकीच्या माणसांच्या मागे उभे राहणे ही आपली संस्कृती नाही, पण…; शिवसेनेचा मोदींना चिमटा
Just Now!
X