रिपब्लिक वाहिन्यांचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी आणि ‘बार्क’चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थ दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअ‍ॅप संवाद शुक्रवारी समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. या संवादावरून अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही या संवादावरून भाजपाला सवाल केला आहे.

अर्णब गोस्वामी आणि पार्थ दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअ‍ॅप संवाद व्हायरल झाल्यानंतर सगळीकडे याची चर्चा सुरू झाली. दोघांमधील संवादामध्ये मंत्र्याबद्दलही आक्षेपार्ह विधान करण्यात आलेली आहेत. त्याचबरोबर बालाकोट एअर स्ट्राईकबद्दलही संवाद झालेला असून, रोहित पवारांनी याच मुद्द्यावरून भाजपाला प्रश्न विचारला आहे.

“कथित पत्रकाराला भाजपाच्या वरपासून तळापर्यंतच्या नेत्यांचा पाठिंबा असल्याचं त्यांच्या चॅटिंगवरुन दिसतंय. भाजपाच्या प्रसिद्धीसाठीच त्यांना ताकद दिली जात होती का? एखाद्या निर्णयापूर्वीच अशा प्रकारे माहिती लिक होत असेल, तर देशविरोधी शक्तीही याचा फायदा उठवू शकतात. हे लोकशाहीला घातक आहे,” असं म्हणत रोहित पवार यांनी चिंता व्यक्त केली आहे.

काय आहे अर्णब गोस्वामी- दासगुप्ता यांच्यातील संवाद?

अर्णब गोस्वामी आणि पार्थ दासगुप्ता यांच्या संवादात पार्थ यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांचा उल्लेख निष्क्रिय (यूजलेस) असा केला आहे. त्याचबरोबर समाज माध्यमांवर प्रसारित झालेल्या संवादांत सर्व मंत्री आपल्याबरोबर आहेत, अशा शब्दांत गोस्वामी यांनी पार्थ यांना दिलासा दिल्याचे उघड झाले आहे. याशिवाय फेब्रुवारी २०१९मध्ये पुलवामा येथे अतिरेक्यांनी घडविलेल्या आत्मघातकी हल्ल्याबाबत अर्णब यांचे आक्षेपार्ह विधान आढळते. या हल्ल्यात ४० केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान शहीद झाले होते. या व्हॉट्सअ‍ॅप संवादात पुलवामा हल्ल्याबाबत अर्णब यांनी केलेल्या विधानाचा समाचार नागरिकांनी ट्वीटरसह अन्य समाजमाध्यमांवरून घेतला. समाजमाध्यमांवर शुक्रवारी याच संवादांबाबत चर्चा होती. मीम्स आणि टीकेचा भडीमार होत होता.