तांडव या वेब सीरिजविरुद्ध देशभरात गुन्हे दाखल होण्याचं सत्रच सुरू झाल्याचं दिसत आहे. सीरिजमधील एका दृश्यावर आक्षेप घेत भाजपानं आक्षेप घेतला होता. धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत भाजपाच्या नेते व कार्यकर्त्यांनी देशभरात दिग्दर्शक व निर्मात्याविरुद्ध ठिकठिकाणी गुन्हेही दाखल केले. त्यामुळे या वादाची सगळीकडे चर्चा सुरू आहे. याच वादाचा हवाला देत शिवसेनेनं भाजपाला धारेवर धरलं आहे. अर्णब गोस्वामी व्हॉट्सअॅप चॅट प्रकरणावर “भाजपाने ‘तांडव’ सोडा, पण भांगडाही केला नाही,” अशा शब्दात शिवसेनेनं समाचार घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘तांडव’मधील दृश्यावरून सुरू झालेल्या वादाचे देशभर पडसाद उमटले. गुन्हेही दाखल झाले. या प्रकरणावर भाजपानं आक्रमक भूमिका घेतलेली असून, शिवसेनेनं अर्णब गोस्वामी व्हॉट्सअॅप चॅट प्रकरणाकडे लक्ष वेधले आहे. ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपावर निशाणा साधला आहे. “भारतीय जनता पक्ष म्हणजे सध्या हास्यविनोदाचा विषय झाला आहे. रोज नवी सोंगे-ढोंगे आणून जनतेचे मनोरंजन करण्याचा प्रयोग ते करीत असतात, पण त्यांचे टुकार प्रयोग जनतेच्या पसंतीस उतरत नाहीत. ‘तांडव’ नावाची एक वेब सीरिज सध्या प्रदर्शित झाली आहे. सध्याच्या राजकारणाचे वास्तव दाखवणारी ही सीरिज असल्याचे सांगतात. दिल्लीचे राजकारण, विद्यापीठातील राजकीय चढाओढ असे काही विषय त्यात घेतले आहेत, पण या सीरिजमध्ये हिंदू देवदेवतांविषयी काही आक्षेपार्ह विधाने असल्याचा बोभाटा भारतीय जनता पक्षाने केला. भारतीय जनता पक्षाने जे ‘तांडव’ सुरू केले आहे, त्यात प्रामाणिकपणाचा लवलेश नक्की किती ही शंका आहेच. कारण जो ‘तांडव’विरोधात उभा ठाकला आहे तोच भाजप भारतमातेचा अवमान करणाऱ्या त्या अर्णब गोस्वामीसंबंधात तोंडात मिठाची गुळणी घेऊन गप्प का बसला आहे? हिंदुस्थानी सैनिकांचा, त्यांच्या हौतात्म्यांचा घोर अपमान जितका गोस्वामीने केलाय तितका अपमान पाकड्यांनीही केला नसेल,” अशी टीका शिवसेनेनं केली आहे.

“काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी संरक्षणमंत्री ए.के. ऍण्टनी यांच्यासह सुशीलकुमार शिंदे, सलमान खुर्शीद आणि गुलाम नबी आझाद यांनीही बुधवारी पत्रकार परिषदेत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची तसेच ‘सरकारी गोपनीयता अधिनियमा’अंतर्गत कारवाई होण्याची मागणी केली आहे. हा सगळा प्रकार म्हणजे देशद्रोहच असून संसदेच्या अधिवेशनात आम्ही हा मुद्दा लावून धरू असा इशाराही काँग्रेस नेत्यांनी दिला आहे. सरकारने याप्रकरणी जे काही सत्य आहे ते बाहेर आणायला हवे. एकतर ‘पुलवामा’तील आमच्या सैनिकांची हत्या हा देशांतर्गत राजकीय कट होता आणि लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी या ४० जवानांचे रक्त सांडवले गेले असे आरोप त्यावेळीही झाले. आता अर्णब गोस्वामीच्या व्हॉटस्ऍपवरील जे काही संभाषण बाहेर आले आहे, ते या आरोपांना बळकटी देणारेच आहे असे म्हणायला जागा आहे. हे सगळे पाहून प्रत्यक्ष भगवान श्रीरामही कपाळावर हात मारून घेत असतील. पुन्हा भारतीय जनता पक्षाने यावर ‘तांडव’ सोडा, पण भांगडाही केला नाही. राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भातील अनेक गुपिते या गोस्वामीने फोडली. यावर भाजप तांडव का करीत नाही?,” असा सवाल शिवसेनेनं भाजपाला केला आहे.

“हा ‘तांडव’ पद्धतीचाच हिंदुत्वाचा अपमान”

“‘तांडव’चे निर्माते व दिग्दर्शकांविरोधात भाजपने उत्तर प्रदेश, बिहारात गुन्हे दाखल केले हे चांगलेच झाले, पण जवानांच्या हौतात्म्याचा अपमान करणाऱया गोस्वामीविरोधातही भाजप असे गुन्हे जागोजागी दाखल करणार असेल तर ते खरे मर्द. भारतीय जनता पक्षाने घेतलेल्या भूमिकांवर आक्षेप घ्यावे असे काहीच नाही, पण हिंदुत्व आणि भारतमातेचा अपमान फक्त ‘तांडव’पुरताच मर्यादित नाही. श्रीमान मोदी हे भगवान विष्णूंचे तेरावे अवतार आहेत, असे भाजपच्या प्रवक्त्यांनी सांगणे हा ‘तांडव’ पद्धतीचाच हिंदुत्वाचा अपमान आहे. ‘तांडव’ सीरिजमध्ये काही आक्षेपार्ह गोष्टी असतील आणि त्यात हिंदुत्व, आमच्या देवदेवतांचा अपमान असेल तर धार्मिक भावना दुखावल्याच्या मुद्द्यांवर कठोर कारवाई होईलच. मुळात श्रद्धास्थाने कोणत्याही धर्माची असोत, त्यांच्याबद्दल असे आक्षेपार्ह उल्लेख करणे चुकीचेच आहे. ‘तांडव’मधील कोणत्या दृश्यांवर भाजपाचा आक्षेप आहे व तो का आहे यावर चर्चा व्हायला हरकत नाही, पण अर्णब गोस्वामीच्या देशद्रोहासंदर्भातदेखील चर्चा घडली तर पुलवामा हल्ल्यातील शहिदांचा आत्मा शांत होईल.

“भाजपाच्या शेंबड्यांना संताप का यावा?”

“भाजपातील काही शेंबड्यांनी आता अशी मुक्ताफळे उधळली आहेत की, अर्णबचे गुप्त ‘चॅट’ उघड झाल्याबद्दल मुंबई पोलिसांवर कारवाई करा. अरे शेंबड्यांनो, मुळात तुमच्या त्या अर्णबने देशाच्या सुरक्षेसंदर्भातही गुप्त माहिती उघड केली त्यावर आधी बोला. उलट मुंबई पोलिसांनी देशावर उपकारच केले आहेत. हे अस्तनीतले साप देशाच्या मुळावरच आले होते. त्यांचा फणा मुंबई पोलिसांनी ठेचला तर भाजपच्या शेंबड्यांना संताप का यावा? आम्हाला आश्चर्य वाटते की, देशातील तमाम तथाकथित राष्ट्रभक्त म्हणवून घेणाऱ्या मीडियाचे. हे लोक स्वतःला राष्ट्राचा चौथा स्तंभ की काय समजतात ना! मग त्यांच्यातल्याच एका वाळवी किड्याने देशाचा स्तंभ पोखरला, राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भातली गुपिते फोडली, त्याने देशद्रोहच केला तरी ‘मीडिया’ थंड का? एरवी सुशांत, कंगना, ईडी, धनंजय मुंडे प्रकरणांवर चोवीस तास वखवखणाऱ्यांना अर्णबच्या देशद्रोही कृत्याची घृणा सोडा हो, पण संताप येऊ नये याचेच दुःख वाटते. शंभर ग्रॅम गांजा कुणाकडे पकडला म्हणून ‘तांडव’ करणारा मीडिया अर्णबच्या देशद्रोही कृत्यावर ‘राष्ट्रीय बहस’ करायला तयार नाही. कारण त्यांचे स्वातंत्र्य, राष्ट्राभिमान त्यांनी कुणाच्या तरी चरणावर गहाण ठेवला आहे. स्वातंत्र्याचा, राष्ट्रवादाचा लढा इतरांनी लढायचा, हे मात्र राष्ट्राचा चौथा स्तंभ म्हणून मिरवणार! सगळाच धंदा झालाय, दोष तरी कुणाला द्यायचा? ‘तांडव’ सुरू आहे, ते चालतच राहील!,” अशी खंतही शिवसेनेनं व्यक्त केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arnab goswami partho dasgupta whatsapp chat shivsena sanjay raut uddhav thackeray devendra fadnavis chandrakant patil ram kadam bmh
First published on: 21-01-2021 at 08:12 IST