अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिकन वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना आज अटक करण्यात आली. रायगड पोलिसांनी त्यांना मुंबईत अटक केली. त्यानंतर अलिबाग पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यात आलं. यावेळी ”आपल्याला पोलिसांनी मारहाण केली”, असा आरोप अर्णब गोस्वामी यांनी केला आहे.

इंटेरिअर डिझायनर असलेले अन्वय नाईक यांनी मे २०१८मध्ये अलिबाग येथे आत्महत्या केली होती. या आत्महत्या प्रकरणात गोस्वामी यांना आज रायगड पोलिसांनी सकाळी अटक केली. त्यानंतर त्यांना अलिबाग पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यात आले. अलिबाग येथे आल्यानंतर एएनआयशी बोलताना अर्णब गोस्वामी यांनी पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांच्या गाडीत असतानाच त्यांनी हा आरोप केला.

५ मे २०१८ रोजी अन्वय नाईक यांनी अलिबाग येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती. अन्वय नाईक यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यासह तिघांची नावं होती. अन्वय नाईक यांनी स्टुडिओचं काम केलं होतं. पैसे थकवल्याचा आरोप करत त्यांनी चिठ्ठीत अर्णब गोस्वामी यांना आत्महत्येला जबाबदार धरलं होतं. अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनीही हा आरोप केला आहे. त्यांनी अर्णब गोस्वामी यांच्यासह तिघांविरोधात तक्रार दाखल केली होती.

“…तर माझा नवरा आज जिवंत असता”

“तीन लोकांची नावं माझ्या नवऱ्यानं सुसाईड नोटमध्ये लिहिलेली होती. एआरजी आउट लायर शेवटचा प्रोजेक्ट होता. पण, फक्त अर्णब गोस्वामीमुळे त्यांना पैसे मिळाले नाहीत. ती जर मिळाली असती, तर माझा नवरा आज जिवंत असता. अर्णब गोस्वामी हा व्हायरस आहे. अर्णब गोस्वामीसारख्या माणसांची ही मानसिकता आहे. जे कामं करून घेतात आणि पैसे देत नाहीत. माझ्या मते कोणत्याही नागरिकाने याला न्याय देऊ नये. आम्ही सुशांत सिंह राजपूत नाही,”असा टीका अक्षता नाईक यांनी केली.