न्यायालयीन कोठडीत मोबाइल वापरल्याचे उघड

अलिबाग/पनवेल : वास्तुसजावटकार अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी अटकेत असलेले रिपब्लिक वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांनी न्यायालयीन कोठडीत असताना मोबाइलचा वापर केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अलिबागमधील कैद्यांसाठीच्या विलगीकरण कक्षातून त्यांची रवानगी रविवारी तळोजा तुरुंगात करण्यात आली.

न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिल्यानंतर अर्णब यांच्यासह फिरोज शेख आणि नीतेश सारडा यांना अलिबागमधील नगरपालिकेच्या शाळेत कैद्यांसाठी तयार केलेल्या विलगीकण कक्षात ठेवण्यात आले होते. त्याआधीच अर्णब यांचा मोबाइल फोन जप्त करण्यात आला होता. मात्र ते मोबाइल फोन वापर असल्याचे उघडकीस आल्याने त्यांच्यासह अन्य आरोपींना तळोजा तुरुंगात हलविण्याचा निर्णय घेण्यात आला.

अलिबाग तुरुंगाच्या विलगीकरण कक्षातून पोलिसांच्या वाहनातून रविवारी सकाळी तळोजा येथे नेण्यात येत असताना अर्णब यांनी ‘तळोजा जेल, तळोजा जेल’ असे ओरडण्यास सुरुवात केली. त्यानंतर विलगीकरण कक्षाबाहेर तळ ठोकून असलेल्या रिपब्लिक वाहिनीच्या प्रतिनिधींनी पोलिसांच्या वाहनाचा पाठलाग करून चालत्या वाहनातून अर्णब यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या वाहनाला लावलेले काळे कापड हटविण्याचाही या प्रतिनिधींनी प्रयत्न केला. त्यांना आवर घातलाना पोलिसांना कसरत करावी लागली.

दरम्यान, अलिबाग कारागृहाच्या ताब्यात असताना अर्णब गोस्वामी यांनी मोबाइल वापरल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे, असे अलिबाग कारागृह अधीक्षक ए. टी. पाटील यांनी सांगितले.