|| कल्पेश भोईर

अर्नाळा किल्ला भागात जेट्टीचे काम धिम्या गतीने:- गेल्या अनेक वर्षांपासून अर्नाळा किल्ल्यात राहणाऱ्या नागरिकांच्या दळणवळण करण्यासाठी जेट्टीची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मात्र जेट्टीचे कामही धिम्या गतीने सुरू असल्याने येथील नागरिकांची परवड कायम आहे. निवडणुका आल्या की फक्त आश्वासने दिली जातात, परंतु ती आश्वासने पूर्णत्वास कधी जाणार, असा सवाल आता सर्वसामान्य नागरिक करू लागले आहेत.

विरार पश्चिमेतील भागात अर्नाळा किल्ला परिसर आहे. या भागात नागरिकांना ये-जा करण्यासाठी बोटीने प्रवास करावा लागत आहे. यासाठी या भागात प्रवासी जेट्टी तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी तीन कोटी २७ लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र या जेट्टीचे काम अधूनमधून बंदच असते. निवडणुका येतात जातात परंतु हे काम काही केल्या पूर्ण होत नसल्याचे सध्याचे चित्र आहे.

जेट्टी बांधण्याचे काम सुरू करण्याआधी अर्नाळा गावातील नागरिक व मच्छीमार बांधव यांच्याशी संवाद साधून चर्चा करण्यात आली होती. अर्नाळ्यातील जेट्टी टी आकाराची असावी जेणेकरून त्याचा फायदा मच्छीमार नौका व प्रवासी बोटींना होईल. जेट्टी बांधत असताना दगडाचा भराव न करता ती सुरुवातीपासून पायलिंग करावी व उंची साधारण १५ फुटांपेक्षा जास्त असावी. मासेमारीसाठी लागणारे बर्फ, पाणी, जाळी, दोर हे सामान ने-आण करण्यासाठी जागा सोडावी. जाण्या-येण्यासाठी दोन्ही बाजूंनी रस्ता असावा, अशा काही सूचना येथील बांधवांनी केल्या होत्या.

शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांची फरफट

अर्नाळा ते अर्नाळा किल्ला या प्रवासासाठी प्रवासी जेट्टी तयार करण्याचे काम रखडलेले असल्याने शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला यांची मोठय़ा प्रमाणात गैरसोय होत असते.  गुडघाभर पाण्यातच बोट उभी करावी लागत आहे, त्यामुळे या नागरिकांना पाण्यातूनच प्रवास करावा लागत असल्याने त्यांची परवड होऊ  लागली आहे. तसेच ज्या वेळेस समुद्राला भरती असते त्या वेळेस शालेय विद्यार्थी शाळेत पोहोचू शकत नाही. या वेळी विद्यार्थ्यांना शाळेला सुट्टी घ्यावी लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.