पाणी योजनेसाठी १६ वर्षे मागणी करूनही अर्नाळा ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष

विरार : अर्नाळा परिसरातील तरीचा पाडा. ६० ते ७० उंबरा असलेल्या या पाडय़ाच्या प्रवेशद्वाराशीच प्लास्टिकचे डबे रांगेत ठेवलेले नजरेस पडतात. अर्थात पाडय़ात पाण्याची सोय आहे म्हणून नव्हे तर दीड ते दोन मैलांवरून विकतचे पाणी आणण्यासाठीची पूर्वतयारी म्हणून पाडय़ातील रहिवासी ही तजवीज करून ठेवतात. पाण्यासाठीची ही वणवण एक-दोन पावसाळ्यांनंतरची नाही, तर तब्बल १६ वर्षे पाडय़ातील नागरिक ग्रुप ग्रामपंचायतीकडे पिण्याच्या पाण्याची योजना सुरू करण्याची मागणी करीत आहेत. मात्र, आजतागायत पाडय़ात शासकीय योजनेतून पाण्याचा एक थेंबही आलेला नाही.

पाण्याशिवाय एखादे गाव-पाडा तग धरू शकेल, असे वाटत नाही. तरीही हंडाभर पाण्यासाठी तरीचा पाडा गेली १६ वर्षे वणवण करीत आहे. घरातील सर्वच सदस्यांना पाण्यासाठी बाहेर पडावे लागते. यातून मुलांचीही सुटका नसते, अशी प्रतिक्रिया विष्णू रामा सुरू यांनी दिली.

पाडय़ात पाणी यावे यासाठी रहिवासी शासनाकडे विनंत्या, आर्जवं करीत आहेत; परंतु शासकीय यंत्रणेला अद्याप जाग आलेली नाही.

पाडय़ावर जाण्यासाठी आवश्यक कोणत्याही मूलभूत सुविधा नाहीतच; पण पिण्याच्या पाण्यासाठी साधी विहीरही खोदण्यात आलेली नाही. त्यामुळे कधीकधी बाहेरून पाणी मिळविण्यासाठी रहिवाशांना पैसे मोजावे लागत आहेत. निवडणुकीच्या वेळी पाडय़ावर मते मागण्यासाठी राजकीय पुढारी येतात. कधीकधी प्रशासकीय अधिकारी नियम म्हणून हजेरी लावतात; पण पाडय़ाला पाणी मिळावे, याविषयी कोणी काही बोलत नाही, असे सुरू यांनी सांगितले. समुद्रकिनारी असल्याने कूपनलिकांना येणारे पाणी क्षारयुक्त असते. त्यामुळे पाडय़ापासून दोन मैलांवर असलेल्या काही रिसॉर्टवरून पाणी आणावे लागत आहे. विरारमधील आगाशी  येथे जाऊन पाणी विकत घ्यावे लागते. यासाठी पायपीट टळलेली नाही. गॅलनसाठी चार रुपये मोजावे लागत असल्याचे सुरू म्हणाले. करोनाकाळात पाडय़ावरील रहिवाशांचे हाल झाले. अनेकांच्या हाताला काम नव्हतेच, पण संसर्ग टाळता यावा म्हणून हात धुण्यासाठी पाणीही नव्हते, अशी प्रतिक्रिया येथील महिलेने दिली. पाडय़ानजीक दवाखाना नसल्याने शासकीय अधिकाऱ्यांकडे तक्रारही करण्यात आली होती.

सरकारी नियमांनुसार तरीचा पाडय़ाला घरपट्टी लागू झाली आहे. पाडय़ातील कूपनलिकांना क्षारयुक्त पाणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे येथे जलशुद्धीकरण यंत्रणा बसविण्याचा ग्रामपंचायतीच्या वतीने निर्णय झाला आहे.

– पंकेश संखे, ग्रामसेवक, अर्नाळा ग्रामपंचायत