सुरक्षात्मक मूलभूत गरजा अपूर्ण; पदरमोड करून निर्जंतुक द्रव्य खरेदी

विरार : विरार अर्नाळा परिसरात नुकताच एका करोनाबाधित रुग्णाच्या मयताला शेकडो लोक गेल्याने अर्नाळा परिसर धोक्याच्या छायेत आहे. सध्या अर्नाळा परिसरातील अनेक विभाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत. असे असताना या विभागात असलेले पोलीस ठाणे मात्र दुर्लक्षित राहिले आहे. या पोलीस ठाण्यात करोनाशी लढण्याच्या कोणत्याही यंत्रणा नसल्याने पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर आहे.

अर्नाळा परिसरात करोनाबाधित रुग्णाच्या मयताला परिसरातील ५०० हून अधिक लोकांनी हजेरी लावली होती. यामुळे या परिसरातील सर्वच गाव पाडय़ात मोठे भीतीचे वातावरण आहे. प्रशासन सध्या या लोकांची माहिती घेऊन त्यांना घरीच अलगीकरणात राहण्याचे सल्ले देत आहेत. अनेक ठिकाणी निर्जंतुक करण्याचे काम सुरू आहे. लोकांची माहिती गोळा करण्यासाठी पोलिसांची मदत घेतली जात आहे. यामुळे या सर्व प्रक्रियेत प्रशासनाबरोबर पोलीस कर्मचारी काम करत आहेत. पण त्यांना सुरक्षात्मक मूलभूत गरजासुद्धा पूर्ण केल्या नसल्याने अनेक पोलीस कर्मचारी करोना संसर्गाच्या छायेखाली वावरत आहेत.

पोलीस ठाण्यात बसविण्यात आलेले निर्जंतुक युनिट शासनाच्या निर्णयानंतर काढून टाकण्यात आले आहे. पोलीस ठाण्यात शासकीय निर्जंतुक द्रव्याचा पुरेसा साठासुद्धा नाही. यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना पदरमोड करून निर्जंतुक द्रव्य खरेदी करावे लागत आहे.

अर्नाळा पोलीस कर्मचाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार सध्या पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारावर विजेवर पायाने चालणारे यंत्र बसविण्यात आले आहे. पण या परिसरात सतत वीज खंडित होत असल्याने यंत्राचा पुरेसा उपयोग होत नाही. तसेच पोलीस ठाण्यात दररोज शेकडो नागरिक येत असतात त्यांचे शरीराचे तापमान मोजणे यासाठी डिजिटल थर्मामीटरची आवश्यकता आहे. पण त्याची उपल्बधता नसल्याने येणाऱ्या नागरिकांना सरळ प्रवेश मिळत आहे. यामुळे सध्या करोनाच्या छायेखाली वावरणाऱ्या अर्नाळा परिसरात काम करणाऱ्या पोलिसांचे आरोग्य संकटात आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दाव्यापेक्षा परिस्थिती उलट

या संदर्भात माहिती देताना उपविभागीय पोलीस अधिकारी विरार रेणुका बागडे यांनी सांगितले की, आम्ही कर्मचार्याच्या सुरक्षतेची पूर्ण खबरदारी घेतो, वेळच्या वेळी निर्जंतुक द्रव्य, मुखवटे आणि हातमोजे पोलीस ठाण्यात दिले जात आहेत, तरीसुद्धा या संदर्भात अधिक माहिती घेतली जाईल असे त्यांनी सांगितले. पोलिसांना वेळच्या वेळी खबरदारीसाठी उपकरणे आणि साधने दिली जात असल्याचा दावा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा असला तरी परिस्थिती मात्र उलटी आहे.