३ कोटी २७ लाख रुपये मंजुर होऊनही स्थानिक नागरिकांची परवड

वसई : अर्नाळा किल्लय़ात राहणाऱ्या नागरिकांच्या दळणवळणासाठी अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर जेट्टी तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र मागील काही वर्षांपासून या कामाला गती मिळत नसल्याने अजूनही या जेट्टीचे काम रखडलेले आहे.

विरार पश्चिमेतील भागात अर्नाळा किल्ला परिसर आहे. हा परिसर बेटावर असल्याने नागरिकांना ये-जा करण्यासाठी बोटीने प्रवास करावा लागत आहे. यासाठी येथील परिसरात मागील तीन ते चार वर्षांपूर्वी जेट्टी तयार करण्याचे काम सुरू केले आहे. या कामासाठी ३ कोटी २७ लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. परंतु या जेट्टीचे काम मागील काही महिन्यांपासून बंद झाले आहे. त्यामुळे येथील नागरिकांना अजूनही गुडघाभर पाण्यात उतरून बोटीत चढून प्रवास करावा लागत आहे.

जेट्टी बांधण्याचे काम सुरू करण्याआधी अर्नाळा गावातील नागरिक व मच्छीमार बांधव यांच्याशी संवाद साधून या जेट्टीचा आराखडा तयार केला होता. अर्नाळ्यातील जेट्टी ‘टी’ आकाराची असावी, जेणेकरून त्याचा फायदा मच्छीमार नौका व प्रवासी बोटींना होईल. जेट्टी बांधत असताना दगडाचा भराव न करता ती सुरुवातीपासून पायलिंग करावी व उंची साधारण १५ फुटांपेक्षा जास्त असावी. मासेमारीसाठी लागणारे बर्फ, पाणी, जाळी, दोर हे सामान ने-आण करण्यासाठी जागा सोडावी. जाण्या-येण्यासाठी दोन्ही बाजूंनी रस्ता असावा, अशा काही सूचना येथील बांधवांनी केल्या होत्या; परंतु अजूनही या जेट्टीचे काम रखडल्याने येथील नागरिकांना  ये-जा करण्यासाठी पाण्यातूनच प्रवास करावा लागत आहे. तसेच भरतीच्या वेळी येथील नागरिकांना मोठय़ा प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. या जेट्टीच्या कामाला गती मिळावी यासाठी अनेक वेळा पत्रव्यवहार करण्यात आला आहे. याबाबत फक्त प्रशासनाकडून आश्वासने मिळत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.

फरफट कधी थांबणार?

अर्नाळा ते अर्नाळा किल्ला या प्रवासासाठी प्रवासी जेट्टी तयार करण्याचे काम रखडलेले आहे. जेट्टी तयार करण्यासाठी आलेले साहित्य हे तसेच पडून आहे. त्यामुळे ही जेट्टी कधी तयार होईल, असा प्रश्न येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे. जेट्टी तयार नसल्याने गुडघाभर पाण्यातच बोट उभी करावी लागत आहे. त्यामुळे या नागरिकांना पाण्यातूनच प्रवास करावा लागत असल्याने त्यांची परवड होऊ लागली आहे. तसेच ज्या वेळेस समुद्राला भरती असते त्या वेळेस अडचणींत आणखीन भर पडते. यामुळे जेट्टीविना होत असलेली फरफट कधी थांबेल, असा सवाल येथील स्थानिक रहिवासी निनाद पाटील यांनी केला आहे.

अर्नाळा किनारा ते अर्नाळा किल्ला भागात जाण्यासाठी जेट्टी तयार करण्याचे काम खूपच संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे आमच्या गावातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. काम पूर्ण करण्यात यावे यासाठी वारंवार मेरीटाइम बोर्डाकडे मागणी केली आहे.

– चंद्रकांत मेहेर, सरपंच, अर्नाळा किल्ला