दिल्लीतील निजामुद्दीन या ठिकाणी झालेल्या तबलिगी जमतीचा झालेल्या कार्यक्रमात सहभागी झालेले ५० ते ६० जण महाराष्ट्रात परतले आणि त्यांनी त्यांचे मोबाइल बंद केले आहेत. पोलिसांना त्यांचा ठावठिकाणा तूर्तास सापडत नाही. मात्र पोलीस राज्यभरातल्या विविध ठिकाणी या सगळ्यांचा शोध घेत आहेत. ५० ते ६० जण हे मोबाइल फोन बंद करुन लपण्याचा प्रयत्न करत आहेत असं महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाने म्हटलं आहे.

निजामुद्दीन दिल्ली येथील तबलिगी मरकजमध्ये जे लोक सहभागी झाले होते त्यातले ५० ते ६० जण बेपत्ता आहेत. त्यांना सूचित करण्यात येतं आहे की त्यांनी लवकरात लवकर जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा आणि चाचणी करुन क्वारंटाइन व्हावे असे आवाहनही गृह मंत्रालयाने केले आहे. असं न केल्यास कठोर कारवाई केली जाईल असे निर्देश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत.

तबलिगी मकरजला गेलेल्या लोकांमुळे मुंबई आणि राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या झपाट्यानं वाढल्याचं चित्र समोर आले आहे. दिवसागणिक ही आकडेवारी वाढतच आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिका करोनाग्रस्तांचा शोध घेऊन त्यांच्यावर तात्काळ उपाचर करत आहे. मरकज येथे गेलेल्या लोकांमुळे इतरांना करोनाची लागण होऊ नये या उद्देशानं पालिकेनं ट्विट करत दिल्लीला कार्यक्रमासाठी गेलेल्या लोकांबाबत माहिती देण्याचं आवाहन केलं होतं. आता असंच आवाहन राज्याच्या गृहमंत्रालयानेही केलं आहे. तसंच हे आवाहन न ऐकल्यास कारवाईचेही आदेश दिले आहेत.