सांगली : राज्यावर १० लाख ७१ हजार कोटींचे कर्ज आहे, याशिवाय मेट्रोसह अन्य प्रकल्पांचे २ लाखाचे कर्ज वेगळे असल्याने कर्जमाफीसाठी थोडा वेळ द्यावा लागेल, असे मत कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांनी इस्लामपुरात व्यक्त केले. राज्याची प्रगती न थांबविता सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी हे सरकार निश्चितच प्रयत्नशील राहीलस असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.

राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर  पाटील यांचे रविवारी जिल्हयात आगमन झाले. कासेगाव येथे त्यांचे जल्लोषी स्वागत झाल्यानंतर इस्लामपूर येथे रविवारी रात्री नागरी सत्कार   करण्यात आला. त्यांच्यासमवेत शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक यांचाही सत्कार करण्यात आला. या वेळी साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील, बँकेचे अध्यक्ष श्यामराव पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील, माजी मंत्री अण्णा डांगे आदी उपस्थित होते.

या वेळी बोलताना मंत्री पाटील म्हणाले,की निवडणुकीनंतर सकाळी एक, दुपारी वेगळी तर संध्याकाळी तिसरी अशी राजकीय स्थिती राज्यात प्रथमच अनुभवता आली. राज्यातील जनतेला आम्ही तिघांनी एकत्र यावं असे वाटत होते. ते शरद पवार यांनी करून दाखविले. शिवसेनेबरोबर जात असताना मागील सरकारकडून झालेल्या चुका, अपयश विचारात घेतले.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे प्रशासकीय कामात यापूर्वी नव्हते. मात्र सरळ माणूस म्हणून त्यांना अनुभवता आले. राज्याला खरे आणि स्पष्ट बोलणारा माणूस आवडतो. हे नवे व्यक्तिमत्त्व सर्वांना विश्वासात घेउन राज्याचा गाडा चालवेल असा विश्वास वाटतो.

राज्यात अनेक गंभीर समस्या आहेत. राज्याच्या तिजोरीवर  १० लाख ७१ हजार कोटींचे कर्ज असून मेट्रोसारखे हाती घेतलेल्या प्रकल्पांचे कर्ज सुमारे २ लाखाचे असून याबाबत माहिती घेण्याचे काम सुरू आहे. शेतकऱ्यांना कर्ज माफी आणि अन्य कामासाठी राज्य शासनाला थोडा वेळ द्यावा लागेल. मागील सरकारच्या काळात जिल्हयातील समस्यांकडे दुर्लक्ष झाले. दुष्काळ, पाणी योजना, महापूर या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले जाईल असेही त्यांनी या वेळी सांगितले.

या वेळी खा. पाटील यांनी सांगितले,की महाविकास आघाडीच्या बांधणीत आ. पाटील यांचे योगदान मोलाचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्यांचे बोट धरले ते आमचे नेते आहेत. यामुळे राज्याच्या विकासाचा गाडा मार्गी लागेल यात शंका नाही.  शेट्टी म्हणाले की, मागील सरकारच्या काळात केवळ घोषणाबाजी झाली. आता शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी जयंत पाटील यांनी पुढाकार घ्यावा.