जिल्ह्यत ११ शासकीय केंद्रासह चार खासगी रुग्णालयात लसीकरण

लोकसत्ता प्रतिनिधी

पालघर : ज्येष्ठ नागरिक तसेच ४५ वर्षांवरील इतर व्याधी/आजार असणाऱ्या नागरिकांसाठी करोना लसीकरणाचा तिसरा टप्पा किरकोळ तांत्रिक अडथळे पार करत सोमवारपासून सुरू झाला. या टप्प्यात पहिल्याच दिवशी ४० हून अधिक  नागरिकांनी लस टोचून घेतली. लसीकरण करण्यासाठी ११ शासकीय  केंद्रांसह चार खासगी रुग्णायांमधून लसीकरणास सुरूवात झाली आहे.

पालघर जिल्ह्यत ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय तसेच मलवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र अशा अकरा ठिकाणी लसीकरणाची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक असल्याने त्यासाठी उपलब्ध सॉफ्टवेअरमध्ये तसेच इंटरनेटमध्ये तांत्रिक दोष निर्माण झाला होता. त्याचा परिणाम थोडावेळ लसीकरणावर झाला. त्यामुळे अनेकांना पहिल्याच दिवशी लसीकरणाचा लाभ घेता आला नाही.

शासकीय रुग्णालयासह प्रधानमंत्री जन आरोग्य सेवा तसेच महात्मा फुले जन आरोग्य सेवा पुरवणाऱ्या पालघर जिल्ह्यतील जनसेवा रुग्णालय (वसई), विजयलक्ष्मी  (नालासोपारा), आस्था  (मनोर) व साई नीट रुग्णालय (बोईसर) या चार ठिकाणी सशुल्क लस घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या सर्व केंद्रातील कर्मचाऱ्यांना सोमवारी जिल्हा आरोग्य विभागातर्फे प्रशिक्षण देण्यात आले. पालघर जिल्ह्यत अन्य पाच रुग्णालयांमध्ये सशुल्क करोना लसीकरणाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी करण्यात आलेले अर्ज हे मान्यतेसाठी प्रलंबित आहेत. येत्या काही दिवसांत जिल्ह्यतील ९ खासगी रुग्णालयात सशुल्क लस उपलब्ध होईल, असे आरोग्य विभागाने सांगितले.

जिल्ह्यत ८८ करोना रुग्ण

पालघर जिल्ह्यच्या ग्रामीण भागात उपचारार्थ ८८ करोना रुग्ण असून त्यापैकी ७१ रुग्ण पालघर तालुक्यात आहेत.  डहाणू तालुक्यात १५ व वाडा तालुक्यात दोन रुग्ण उपचार घेत आहेत. जव्हार, मोखाडा, तलासरी, वसई ग्रामीण व विक्रमगड तालुक्यांत सद्य:स्थितीत करोनाचा एकही रुग्ण नाही, असे शासकीय अहवालावरून दिसून येते. ग्रामीण भागात करोनामुळे आतापर्यंत ३०६ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत ग्रामीण भागात १५ नवीन रुग्णांची वाढ झाली आहे.  हे सर्व रुग्ण पालघर तालुक्यातील आहेत.

दोन टप्प्यांत २५ हजार सरकारी कर्मचाऱ्यांना लस

करोना लसीकरणाच्या पहिल्या दोन टप्प्यांत २५ हजार आरोग्य कर्मचारी तसेच शासकीय अधिकारी- कर्मचाऱ्यांचे  लसीकरण करण्यात आले आहे. त्यांच्यापैकीच सुमारे पाच हजार कर्मचाऱ्यांनी याअंतर्गत दुसरा डोस देण्यात आले आहेत.