उस्मानाबाद जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच एका लग्नसोहळ्यामुळे २४ नव्या करोनाबाधितांची यात भर पडली आहे. त्यामुळे या लग्नसोहळ्याला उपस्थित असणाऱ्या वधुपित्यासह २०० जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

विवाह सोहळ्यात उपस्थित राहून वधू-वरांना आशीर्वाद देणे पाहुण्यांना चांगलेच महागात पडले आहे. विवाह सोहळ्याला उपस्थिती लावल्यामुळे २०० जणांचा जीव टांगणीला लागला आहे. विवाह सोहळ्याला हजर असणाऱ्यापैकी २४ जण बाधित झाले असल्याचे समोर आले आहे.

भूम तालुक्यातील राळेसांगवी गावात २९ जूनला वधूपित्याने विवाह सोहळा आयोजित केला होता. मात्र, वधू पित्यालाच करोनाची बाधा झाल्याने वऱ्हाडी मंडळी अडचणीत सापडली. आत्तापर्यंत वधू पित्याच्या संपर्कात आलेल्या २४ जणांना करोनाची बाधा झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर आणखी १५ ते १७ जणांचा अहवाल प्रलंबित असल्याने चिंतेत वाढ झाली आहे.

पोलिसांनी वधू पित्यासह २०० जणांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करताना पोलिसांची देखील भंबेरी उडत आहे.