कर्नाटकचे गृहमंत्री के. जॉर्ज यांना एका वृत्तवाहिनीवरून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या संशयित श्रीहंस बापूसाहेब पाटील (वय ४५, रा, शाहूपुरी, कोल्हापूर) याला शनिवारी स्थानिक गुन्हा अन्वेशन पथकाने शिरोळ तालुक्यातील नांदणी येथे अटक केली. निव्वळ प्रसिद्धीसाठी थेट कर्नाटकच्या गृहमंत्र्यांस मारण्याची धमकी देणाऱ्या पाटील याच्या वक्तव्यामुळे कर्नाटकसह कोल्हापूर पोलिसांची झोप उडाली होती. पाटील याच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल झालेले आहेत.
बेंगलोर येथे एका वृत्तवाहिनीशी बोलताना पाटील याने आपण कोल्हापुरातील नामचीन गुंड शिवाजी गावडे असल्याचे सांगून गृहमंत्री जॉर्ज यांचा खून करणार असल्याचे सांगितले होते. या वृत्ताने कर्नाटक पोलिसांचे धाबे दणाणले. विशेष म्हणजे या गुंडाने स्वतचा मोबाईल नंबरही संबंधित वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीला दिला होता. वृत्तवाहिनीवरून शुक्रवारी रात्री ही बातमी प्रसारित झाली. त्यानंतर कर्नाटक पोलीस या गुंडाच्या शोधात होते. दरम्यान मोबाईलवरून हा गुंड कुरूंदवाड हद्दीत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. कर्नाटक पोलिसांनी कोल्हापूर गुन्हे अन्वेशन पथकास ही माहिती दिली. त्यांनी इचलकरंजी गुन्हा अन्वेशन शाखेच्या मदतीने पाटील याला पकडण्यासाठी सापळा रचला.
त्यानुसार पोलिसांचे पथक कुरूंदवाडकडे रवाना झाले. त्यापूर्वीच पाटील हा कुरूंदवाड येथून पसार झाला होता. कुरूंदवाड येथून तो नांदणी येथे गेला होता. याची माहिती मिळताच हे पथक नांदणी येथे गेले. पोलिसांना पाहताच पाटील याने धूम ठोकली. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला अटक केली. पाटील याच्यावर कोल्हापूर पोलिसांत जमिनीच्या खरेदी-विक्रीत फसवणूक केल्याचे गुन्हे दाखल असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक महंमद मकानदार, पोलीस उपअधीक्षक चतन्या एस. यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.