सुवर्णालंकारातील मणी बनवण्यासाठी देण्यात आलेल्या १५३ गॅ्रम सोन्याच्या वसुलीसाठी डांबून ठेवलेल्या दोघा तरुणांची पोलिसांनी सुटका केली. याप्रकरणी सांगलीतील चार सराफ व्यावसायिकांना अपहरण केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
सांगलीतील सराफ प्रशांत जाधव, संतोष सुर्वे, शरद नार्वेकर आणि सतीश पावसकर यांच्याकडे सुनील पंडित हे सुवर्णालंकार बनवण्यासाठी काम करीत होते. वरील सराफांनी पंडित याला १५३ ग्रॅम सोने मणी बनवण्यासाठी दिले होते. काही दिवसांपूर्वी पंडित मंगळवेढा या गावी गेले. तिकडे ते परत आले नाहीत. त्याने सोने अथवा मणी वारंवार मागणी करूनही दिले नाहीत. त्यामुळे वरील चौघांनी पंडित यांच्या घरी जाऊन त्यांचा मुलगा उदय पंडित व भाचा विश्वास महामुनी (रा. आंधळगाव) या तरुणांना जबरदस्तीने गाडीत घालून आणले. सांगलीत आणून त्यांना एका हॉटेलमध्ये कोंडून ठेवून मारहाण केली.
सांगली पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकून या दोघांची मुक्तता केली. त्या दोघांच्या जबाबानुसार चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.