गुन्ह्यात मदत करण्यासाठी सव्वालाखाची लाच मागणाऱ्या पोलीस निरीक्षकांसह हवालदाराला शुक्रवारी सकाळी लाचलुचपत विभागाने सांगलीत अटक केली. सव्वालाखांपकी १ लाख रुपये या दोघांनी तक्रारदाराकडून उकळले होते. मात्र उर्वरित २५ हजारांचा पाठपुरावा सुरू होता.
तीन महिन्यांपूर्वी सांगलीच्या गुन्हे अन्वेषण विभागाने कूपवाड औद्योगिक वसाहतीत बोगस खत कारखान्यावर छापा टाकून बनावट खत वाहनासह जप्त केले होते. या प्रकरणी खत उत्पादन करणाऱ्या तरुणाला अटकही करण्यात आली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल असणाऱ्या आरोपीला मदत करण्यासाठी व जप्त करण्यात आलेले वाहन परत करण्यासाठी आरोपीच्या वडिलाकडे एक लाख पंचवीस हजार रुपयांची मागणी केली होती. यापकी एक लाख रुपये घेऊन उर्वरित पंचवीस हजार रुपयासाठी मागणी होत असल्याची तक्रार आरोपीच्या वडिलांनी लाचलुचपत विभागाकडे केली होती.
पुणे येथील लाचलुचपत विभागाच्या पथकाने या तक्रारीची पडताळणी केली असता पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी लाचेची मागणी करून ही रक्कम गुन्हे अन्वेषण विभागाचा हवालदार दीपक सदामते याच्याकडे देण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे शुक्रवारी पथकाने गुन्हे अन्वेषण विभागाच्या कार्यालयात जावून पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम व हवालदार दीपक सदामते या दोघांना अटक केली. दोघांविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय अधिकारी व कर्मचारी लाच मागत असतील, तर तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन उपअधीक्षक प्रदीप आफळे व निरीक्षक वसंतराव बाबर यांनी केले आहे.