ज्येष्ठ विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी शुक्रवारी अटक करण्यात आलेल्या तिघांना कोर्टात हजर केले असता त्यांना कोर्टाने १६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

सचिन प्रकाशराव अंदुरे (वय ३२, रा. राजबाजार, जि. ओरंगाबाद), अमित रामचंद्र बद्दी (वय २९, रा. हबीब चाळ, हुबळी कर्नाटक), गणेश दशरथ मिस्किन (वय ३०, रा. चैतन्यनगर, हुबळी) अशी या तिघांची नावे आहेत. तिघांना न्यायालयात हजर केले असता, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. ए. माळी यांनी त्यांना १६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. गुरुवारी रात्री पुणे येथून सचिन अंदुरे याला तर मुंबईतून अमित बद्दी आणि गणेश मिस्कीन यांना कोल्हापूर एसआयटीने ताब्यात घेऊन पहाटे कोल्हापूर येथे अटक केली होती.

पानसरे हत्येतील दोन नंबरचा संशयित आरोपी वीरेंद्रसिह तावडे याने कोल्हापूरातील एक लेखक व इतर शहरातील दोघा पुरोगामी विचारवंताची रेकी करण्यासाठी कोल्हापुरमध्ये एका खोलीत बैठक आयोजित केली होती. त्यावेळी सचिन अंदुरेसह आणखी तीन जण हजर होते. पानसरे हत्येपूर्वी फेब्रुवारी २०१५मध्ये बेळगावात कॉ. पानसरे हत्येच्या कटाची बैठक झाली. यामध्ये सचिन अंदुरे, गणेश मिस्किन, अमित बद्दी हे उपस्थित होते. या तिघांकडे कोणती जबाबदारी होती व या कटात आणखी कोण सहभागी होते याचा तपास करायचा असल्याने त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी कोर्टाकडे केली होती.

अमोल काळे काळे याने पानसरे हत्येपूर्वी सचिन अंदुरे याला महालक्ष्मी मंदिर येथे बोलवले होते. तेव्हा ते कुठे-कुठे थांबले होते तसेच अंदुरे, मिस्किन, बद्दी आणि वासुदेव सूर्यवंशी यांनी एकत्र फायरिंगचा सराव केला होता त्यावेळी अंदुरे याने ७ राऊंड आणले होते तर मिस्किन याने पिस्तूल आणले होते. त्यातील एक राऊंड वासुदेव सूर्यवंशी याने फायर केला होता असे तपासात निष्पन्न झाले आहे. तर इतर ६ राऊंड व पिस्तूल याचा शोध घेण्यात येत आहे, असे तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात सांगितले. संशयित आरोपी बद्दी हा वारंवार कोल्हापूरमध्ये येत होता. तो कोणत्या कामासाठी व कोणाकडे येत होता, याची माहिती घेण्यासाठी संशयिताना वेगवेगळ्या ठिकाणी फिरावे लागणार आहे, असा युक्तिवाद राणे यांनी यावेळी कोर्टात केला.

तपास अधिकाऱ्यांकडून अंदुरेचा छळ?

एसआयटीचे तपास अधिकारी काकडे यांनी सीबीआयच्या कोठडीत असताना आपला छळ केल्याचा आरोप सचिन अंदुरेने केला आहे. मला रात्री तीन वाजेपर्यंत टोर्चर करण्यात आले तसेच या गुन्ह्यात अडकवण्याची धमकीही दिली गेली, याची तक्रार मी मानवाधिकार आयोगाकडे केली असल्याचे यावेळी अंदुरेने म्हटले आहे.