पेन्शन बँकेत जमा झाली आहे, ती मिळवून देतो अशी बतावणी करुन वयोवृध्दांना फसवून त्यांची लुबाडणूक करुन कोल्हापूर जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या दस्तगीर गुलाब शेख (वय ३६ रा. सदरबाजार कोल्हापूर) यास शिवाजीनगर पोलिसांनी  शनिवारी  जेरबंद केले. कोल्हापूर, इचलकरंजीसह जिल्ह्यातील ३८ हून अधिक फसवणुकीचे प्रकार केल्याचे त्याने सांगितले. फसवणुकीतून लंपास केलेले सुमारे ३० लाख रुपये किमतीचे १ किलो १२० ग्रॅम सोन्याचे दागिने त्याच्या घरातून पोलिसांनी जप्त केले.
शेख हा फळविक्रीचा व्यवसाय करत होता. कोल्हापुरात वृध्दांना गाठून त्यांना लुबाडण्याचा हा प्रकार त्याच्याकडून गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. शेख याने सोने वितळवून त्याच्या लगडय़ा बनविल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणात कोणत्या सराफाचा सहभाग आहे याचाही शोध घेण्यात येत आहे. फसवणुकीचे मोठय़ा प्रमाणात गुन्हे उघडकीस येण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे. शिवाजीनगरचे पोलिस कॉ. सुरेश नारायण सावंत व मन्सुरअली  जमादार या दोघांच्या अथक प्रयत्नानंतर शेख याला गजाआड करण्यात यश आले.
अपर पोलिस अधीक्षक एम. एम. मकानदार, सहायक पोलिस अधीक्षक चतन्य एस. यांनी शनिवारी पत्रकार बठकीत ही माहिती दिली. शिरोळ तालुक्यातील अब्दुललाट येथील रामगोंडा पाटील व त्यांच्या पत्नी हे दोघेजण कराड येथील नातेवाइकांकडे जाण्यासाठी ३ मे रोजी इचलकरंजीत आले होते. बसस्थानकात त्यांना गाठून दस्तगीर शेख याने पेन्शनच्या बहाण्याने रामगोंडा पाटील यांना मोटरसायकलवर बसवून स्टेशन रोडवरील डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ नेऊन सोडले व पुन्हा बसस्थानकात येऊन रामगोंडा पाटील यांच्या पत्नीस बँकेस सही लागणार आहे, दागिने काढून ठेवा अशी बतावणी करुन त्यांच्याकडील दागिने लांबविले होते. या फसवणुकीच्या घटनेनंतर  सावंत व जमादार हे दोघेही पोलिस शेख याच्या पाळतीवर होते. घटना घडल्यानंतर दोन दिवस बनावट दागिने परिधान करुन वृध्दांच्या मदतीने संबंधित चोरटय़ाला पकडण्याचा प्रयत्न झाला. मात्र ते निष्फळ ठरले. त्यानंतर रामगोंडा पाटील यांना सोबत घेऊन फसवणूक करणाऱ्याचा शोध घेण्यात येत होता. अखेरीस मध्यवर्ती बसस्थानकात कोल्हापूर एस.टी.तून उतरताना शेख याला ताब्यात घेण्यात आले. त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने केलेल्या गुन्ह्यांचा पाढा वाचला.
कोल्हापुरातील जुना राजवाडा, लक्ष्मीपुरी, इचलकरंजी, कुरुंदवाड, वडगांव, शिरोळ, मुरगूड, गांधीनगर, हुपरी, भुदरगड, कोडोली, कागल, करवीर, आजरा, जयसिंगपूर, गडिहग्लज आदी विविध ठिकाणी त्याने फसविले आहे. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. शेख याच्याकडून आणखीन काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून त्याच्याकडून या गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकलही जप्त केल्याचे मकानदार यांनी सांगितले.  शेख याच्याकडून पेन्शनच्या बतावणीखाली फसवणूक झालेल्यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही या वेळी करण्यात आले. ही कारवाई पोलिस नि. संजय साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.