केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेच्या वेळीच सभागृहाबाहेर निष्काळजीपणातून गोळीबार करणाऱ्या एकास कोतवाली पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडील रिव्हॉल्व्हरही जप्त करण्यात आले. आज दुपारी दीडच्या सुमारास ही घटना शहरातील यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहाच्या आतील प्रवेशद्वारात घडली.
रंभाजी देवराम रोहकले (रा. भाळवणी, पारनेर) असे या बेपर्वाई दाखवणाऱ्याचे नाव आहे. गोळीबारातून दोघे जण मात्र नशिबानेच वाचले. एका वृद्ध इसमाच्या पायजम्याला चाटून गोळी गेली. गोळीबाराचा आवाज ऐकून सभागृहातील नेते व श्रोते दचकलेही. त्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार यांचे भाषण सुरू होते. श्रोत्यांत सुरू झालेली कुजबुज ऐकून शेलार यांनी ‘बाहेर टायर फुटल्याचा आवाज आहे’ असे म्हणत वेळ सावरली. त्यामुळे सभागृहातील अनेकांना बाहेर गोळीबार झाल्याची कल्पना आली नाही. नंतर मात्र अनेकांना ही घटना समजली.
श्रद्धांजली सभेसाठी जिल्हय़ातील अनेक नेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित होते. पोलीस बंदोबस्तही तैनात होता. सभा सुरू असताना बाहेर अनेक पदाधिकारी व कार्यकर्तेही उपस्थित होते. त्याच घोळक्यात बोलत उभे असलेल्या रोहकले यांच्या खिशातून रिव्हॉल्व्हर खाली फरशीवर पडले. पडलेल्या रिव्हॉल्व्हरमधून एक राऊंडही फायर झाला. गोळी जोरदारपणे जमिनीवर आपटली. ती गोळी एकाच्या पायजम्याला चाटून गेली. गोळीबाराच्या आवाजाने प्रवेशद्वारात उभ्या असलेल्या अनेकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
रोहकले हे अनेकांच्या परिचित आहेत. काहींनी त्यांना लगेच निघून जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार ते निघून गेले व काही वेळातच परतले. नंतर तेथील पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांच्या चौकशीत त्यांच्याकडील रिव्हॉल्व्हर परवानाधारक असून त्याची नोंद करण्यात आलेली आहे. पोलिसांनी निष्काळजीपणा दाखवून लोकांच्या व स्वत:च्या जीवितास धोका निर्माण केल्याच्या आरोपावरून रोहकले यांना अटक केली. त्यांच्याकडील रिव्हॉल्व्हरही जप्त करण्यात आले आहे. यासंदर्भात पोलीस हवालदार भाऊसाहेब गडाख यांनी फिर्याद दिली आहे. या रिव्हॉल्व्हरमध्ये एकूण सहा गोळय़ा होत्या.