महाराष्ट्राच्या मातीत व मराठी माणसात काहीही कमी नाही. त्यांच्यात फक्त इच्छाशक्ती नाही. इच्छाशक्ती असेल तर ‘लवासा’ प्रकल्प होतो मग राज्याचा विकास का होत नाही? तिकडे लवासासाठी जीव ओतून काम करता, मग इकडे राज्यासाठी का नाही, असा सवाल करीत, आम्हीच या महाराष्ट्राचे राजे असल्याचा त्यांचा माज उतरवून जनतेने राज्यात बदल घडवावा, असे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले व केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचा नामोल्लेख टाळून त्यांच्यावर जोरदार प्रहार केले.
पक्षबांधणीसाठी शुक्रवारी सायंकाळी नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानावर राज ठाकरे यांची जाहीर सभा झाली. त्या वेळी त्यांनी ठाकरी शैलीत भाषण करीत तरुण पिढीची मने काबीज केली. या सभेसाठी अभूतपूर्व अशी गर्दी उसळली होती. मैदानाबाहेरील रस्त्यांवरही गर्दी ओसंडली होती. झाडांवर आणि रस्त्यावरील ८० फूट उंच दिशादर्शक फलकावरही तरुणवर्गाने चढाई केली होती.
केंद्रात शरद पवार व सुशीलकुमार शिंदे यांच्यासारखी मातब्बर नेतेमंडळी असूनही राज्यावर केंद्राकडून होणाऱ्या अन्यायाचा पाढा त्यांनी वाचला. मुंबईतील एअर इंडियाचे कार्यालय केंद्रीय विमान वाहतूकमंत्री अजितसिंह यांनी नवी दिल्लीत पळविण्याचा घाट घातल्याचा आरोप त्यांनी केला. या कार्यालयात मुंबईतील मराठी तरुण नोकरी करतात. ते दिल्लीत नेण्याचा डाव हाणून पाडू, असे ते म्हणाले. महाराष्ट्र स्वाभिमानाने व सन्मानाने उभा राहावा म्हणून  प्रखर लढा देत राहू. त्यासाठी कितीही वेळी अटक झाली तरी त्यास आपण भीक घालणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
दुष्काळावर मात करून जनतेला दिलासा देण्याची जबाबदारी सत्ताधारी पाळत नाहीत. दुष्काळग्रस्त भागाचे दौरे काढले की त्यांचे काम संपले. त्यामुळे दुष्काळग्रस्तांचे तांडे मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक यांसारख्या महानगरात येत आहेत. तेथे आधीच येत असलेल्या परप्रांतियांच्या लोंढय़ांबाबतही सत्ताधाऱ्यांना काही देणेघेणे नाही, अशी टीका त्यांनी केली.
आपण मते मागायला आलो नाही, तर मत मांडायला आणि मत बनवायला आलो आहोत, असे स्पष्ट करीत आगामी निवडणुकांपर्यंत आपले मत मनात साठवून ठेवा आणि बदल घडवा, अशी हाकही त्यांनी दिली.