कोल्हापूर-करोना संसर्गशी लढण्यासाठी मानवी प्रतिकार शक्ती वाढावी म्हणून महाराष्ट्रातील पाच कोटी जनतेला आर्सेनिक अल्बम व आयुर्वेदिक औषधे मोफत देणार असल्याची माहिती, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी दिली. औषधे खरेदीचे अधिकार संबंधित जिल्हा परिषदांना असल्याचेही त्यांनी सांगितले. मंत्री मुश्रीफ म्हणाले, करोना विषाणूशी संपूर्ण देश व राज्य संघर्ष करीत आहे. हे संकट
अनपेक्षीत, नवे होते. यावर राज्य शासनाने काम करून संसर्ग नियंत्रणात आणण्यात यश मिळविले आहे.  गेले १०० दिवसापेक्षा जास्त लॉकडाउनमुळे राज्य व केंद्र शासनाच्या आर्थिक स्त्रोतांना मर्यादा आलेल्या आहेत.

केंद्र व राज्य शासनाने प्रत्येक विभागाचा अखर्चित निधी, तो वेळेत खर्च केला नाही. याची माहिती घेण्याचे काम सुरू केले होते. आपल्या ‘ग्रामविकास विभागानेही १३ व्या वित्त आयोगाचा अखर्चित निधी व १४ व्या वित्त आयोगाच्या रक्कमेवरील व्याज या निधीमधून राज्याच्या पातळीवरून ग्रामीण भागातील ५ कोटी लोकांना कोरोना ‘विषाणूचा सामना करण्यासाठी प्रत्येकाच्या शरीरामध्ये प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी होमियोपॅथीक अर्सेनिक अल्बम हे आयुर्वेदीक औषध चांगली कामगिरी करते, असे आयुष मंत्रालयाने शासन निर्णय घेवून परिपत्रक काढले आहे. त्यामुळे सदर औषधे खरेदी करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागानेही घेतला होता. विभागाने अर्सेनिक अल्बम गोळ्या खरेदीसाठी निविदा काढली गेली. त्या दरांमध्ये औषधे मिळणे आवश्यक होते, तो उद्देश सफल होऊ शकला नाही. त्यामुळे खरेदी प्रक्रीया रद्द करण्यात आली आहे.

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील नियुक्त समितीने उपरोक्त औषधे तात्काळ जिल्हयातील ग्रामीण जनतेला आवश्यक त्याप्रमाणे कमीतकमी कालावधीत निविदा प्रक्रिया पूर्ण करून खरेदी करावी. आयुष मंत्रालयाच्या सूचनास अनुसरून आरोग्य विभागाच्या शासन निर्णयाप्रमाणे मोफत औषध जनतेला तत्परतेने पुरवावे. सदर कार्यासाठी जमा केलेल्या रक्कमेतून खरेदीचा खर्च येईल व खर्च भागवून उर्वरीत रक्कम ज्या-त्या जिल्हा परिषदांना जमा करण्यात येईल. ही प्रक्रिया व वाटप तीन आठवड्यामध्ये पूर्ण करावे, असेही जिल्हा परिषदांना कळविण्यात आले आहे. यासंबंधीचा विभागाचा शासन निर्णय व आरोग्य मंत्रालय यांचे शासन निर्णय जिल्हा परिषदांना आवश्यक कार्यवाहीस्तव पाठविण्यात आले आहेत.