लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर शहरात कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या घटना वाढत असतानाच सोमवारी मध्यरात्री सिन्नर फाटा, चेहेडी व जुना ओढा रोड भागात टोळक्याने धुडगूस घालत मालमोटार, टेम्पो, रिक्षा व दुचाकी वाहनांची जाळपोळ केल्यामुळे स्थानिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहरात वाहन जाळपोळीचे प्रकार तसे नवीन नाहीत, परंतु पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी गुन्हेगारांविरोधात धडक कारवाई सुरू केल्यानंतर असे प्रकार नियंत्रणात आणण्यात यश आले होते, परंतु गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी मंडळी पुन्हा डोके वर काढत असल्याचे दिसते. नाशिकरोड परिसरात दहशत माजविण्याच्या उद्देशाने समाजकंटकांनी वाहन जाळपोळीचा मार्ग अनुसरला. सोमवारी मध्यरात्री नाशिकरोड ते सिन्नर फाटा परिसरातील चेहडी, जुना ओढा रोड परिसरात अर्धा ते पाऊस तास धुमाकूळ घालत वेगवेगळ्या ठिकाणी दुचाकी, मालमोटार, टेम्पो, रिक्षा वाहने जाळण्यात आली. सिन्नर फाटा परिसरालगतच्या गायत्रीनगर येथे आरीफ सुभान गनी शेख यांचा टेम्पो पेटवून देण्यात आला. त्यात टेम्पोचे अतिरिक्त टायर आणि ताडपत्री भस्मसात झाली. या ठिकाणी जवळच उभ्या असलेल्या अन्य टेम्पोलाही आगीची झळ बसली. ही जीप हिरालाल फकीरचंद जैन यांच्या मालकीची होती. याशिवाय, सावळीराम नगर तसेच गायकवाड मळा परिसरातील काही दुचाकी वाहने तसेच मधुकर कणसे यांची रिक्षा पेटवून देण्यात आली. त्यानंतर टोळक्याने सिन्नर फाटा येथील खर्जुल मळा परिसरात आपला मोर्चा वळविला. तेथील ज्ञानेश्वर बोरसे यांची मालमोटार पेटवून देण्यात आली. तीन ठिकाणी टोळक्याने वाहन जाळपोळीचे सत्र राबवत पोलिसांना गुंगारा दिला.
महत्त्वाची बाब म्हणजे, या घटनेच्या काही तास अगोदर शिव जयंतीच्या पार्श्वभूमीवर, नाशिकरोड परिसरात पोलीस दलाचे संचलन झाले होते. त्यानंतर रात्री परिसरात वाहन जाळपोळीचे सत्र घडल्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप कोणाला अटक झाली नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.