आदिवासी चित्रकारांचा कलाप्रसार खुंटला; शासनाचे आश्वासनाकडे दुर्लक्ष

लग्नसोहळ्यात घराच्या भिंतीवर काढण्यात येणारा वारली चित्रकलेमधील ‘चौक’ आणि इतर चित्र सातासमुद्रापार पोहोचवणाऱ्या डहाणू तालुक्यातील गंजाड गावचे दिवंगत जिव्या सोमा म्हसे यांचे आपल्या भागात आदिवासी कला व संस्कृतीचे दर्शन घडवण्यासाठी कलादालन उभारण्याचे स्वप्न अजूनही अपूर्णच आहे. या परिसरात म्हसे यांचे शिष्य आणि अन्य आदिवासी चित्रकारांची चित्रकला कलादालनाच्या अभावी अपेक्षित प्रमाणात बहरू शकली नाही. कलादालन उभारण्याचे आश्वासन शासनाकडून देण्यात आले होते, मात्र हे आश्वासन हवेत विरले आहे.

तांबडय़ा रंगाच्या कागदावर किंवा गेरूने रंगवलेल्या भिंतीवर काढलेली वारली चित्रे अनेकांनी पाहिली असतील. वारली या आदिवासी जमातीची ही वैशिष्टय़पूर्ण चित्रकला जगभरात प्रसिद्ध करण्याचे काम डहाणूजवळील गंजाड येथे राहणाऱ्या जिव्या सोमा म्हसे यांनी केले. भारताच्या आदिम चित्रकलेचा जगभरात प्रसार झाल्याने शासनाने त्यांना ‘पद्मश्री’ देऊन सन्मानित केले. म्हसे यांनी अनेक स्थानिक तरुणांना वारली चित्रकलेचे धडे दिले.

वारली चित्रकलेचा प्रसार व्हावा याकरिता डहाणू परिसरात एक कलादालन असावे अशी इच्छावजा मागणी म्हसे यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याकडे व्यक्त केली होती. शासनाने त्यावेळी कलादालन उभारण्याचे आश्वासन दिले, मात्र अद्याप अशा प्रकारचे कलादालन अस्तित्वात आलेले नाही.  १५ मे २०१८ रोजी म्हसे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची ६५ वर्षांची वारली चित्रकलेची सेवा अनेक वारली चित्रकारांना प्रेरणा देऊन गेली. त्यांची सदाशिव व बाळू ही मुले तसेच राजेश वांगड, शांताराम गोरखाना हे त्यांचे शिष्य त्याचप्रमाणे म्हसे परिवारातील तिसरी पिढी वारली चित्रकलेचे प्रशिक्षण देत आहे. म्हसे यांच्या शिष्यांनी गंजाड परिसरातील ४० ते ५० तरुणांना वारली चित्रकलेचे धडे दिले आहेत. मात्र  या चित्रकारांना व त्यांच्या चित्रांना योग्य प्रसिद्धी मिळत नाही. त्यामुळे येथे वारली कलादालनाची उभारणी होणे गरजेचे असल्याचे स्थानिक कलावंतांनी सांगितले.

डहाणू भागात ५० पेक्षा अधिक वारली चित्रकार आहेत. त्यांच्या चित्रांना योग्य प्रसिद्धी मिळत नाही. या भागात वारली चित्रकलेसाठी कलादालन असावे अशी इच्छा माझे वडील जिव्या सोमा म्हसे यांची होती. त्यांना सरकारकडून आश्वासनही मिळाले होते. मात्र अद्याप ही मागणी पूर्ण झालेली नाही.

– बाळू म्हसे, वारली चित्रकार