राज्यात सध्या असलेल्या कारागृहांमध्य कैद्यांची संख्या हळूहळू वाढू लागली असून त्यांच्यासाठी आता ही कारागृहे अपुरी पडू लागली आहेत. त्यातच, करोना काळामध्ये कारागृहांमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी अनेक कैद्यांना पॅरोल किंवा इतर सुट्या मंजूर करण्याचा मार्ग मध्यंतरी न्यायालयानेच सुचवला होता. या पार्श्वभूमीवर राज्यात कैद्यांची वाढती संख्या लक्षात घेता मुंबईतील चेंबुरमध्ये मियामी आणि शिकागो येथील कारागृहाच्या धर्तीवर महिला बाल कल्याण विभागाच्या जागेवर कच्च्या कैद्यांसाठी बहुमजली कारागृह बांधण्यात येणार आहे. यामुळे मुंबईतील आर्थररोड कारागृहावरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. तिथे जवळपास ५ हजार कच्च्या कैद्यांची व्यवस्था होणार आहे. अशी माहिती कारागृह महासंचालक सुनील रामानंद यांनी दिली. याशिवाय, महाराष्ट्रात नव्याने ५ कारागृह उभारणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं.

अंतिम मंजुरी मिळताच होणार काम सुरू!

राज्यातील अनेक कारागृहांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कैद्यांची संख्या झाली आहे. या पार्श्वभूमीवर कारागृहांचा विस्तार करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. त्यानुसार,  या मुळे आर्थर रोड कारागृहातील ताण कमी होणार आहे . त्यामुळे इथली क्षमता ५ हजार कच्च्या कैद्यांची होणार आहे. याशिवाय राज्याच्या इतर चार ठिकाणी देखील कारागृहे अपुरी पडत असल्याचं निदर्शनास आलं असून तिथे देखील नव्याने कारागृह बांधण्यात येणार असल्याचं सुनील रामानंद यांनी यावेळी सांगितलं. यामध्ये सह मुंबई ,पुणे, हिंगोली, पालघर आणि गोंदिया या ठिकाणचा समावेश आहे. यासंदर्भातील प्रस्तावाला मान्यता मिळताच या पाचही ठिकाणी काम सुरू करण्यात येईल, असंही रामानंद यावेळी म्हणाले.

४ हजार २४३ कैद्यांना करोनाची लागण

“राज्यातील विविध कारागृहात अंदाजे ४५ हजार कैदी आहेत. त्यापैकी १३ हजाराहून अधिक कैद्यांना करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाच्या आदेशानुसार जामिनावर सोडण्यात आले आहे. तर त्याच दरम्यान कैद्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने आजअखेर काही ठिकाणी १ ते सव्वा महिना कारागृह लॉकडाउन करून घेण्यात आले. यामुळे करोना विषाणूचा शिरकाव अधिक होऊ शकला नाही. मात्र, तरी देखील ४ हजार २४३ कैदी बाधित झाले असून ४ हजार १५७ बरे झाले. त्याच दरम्यान १३ कैद्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे, अशी माहिती रामानंद यांनी दिली.

चिकन, मटण, मिठाई ते श्रीखंड; कारागृहात कैद्यांची होणार चंगळ! कँटीनमध्ये मिळणार चविष्ट पक्वान्न!

२३ हजार ४२४ कैद्यांना दिली लस

आता सध्या ७५ कैद्यांवर करोना आजारावर उपचार सुरू आहेत. या कारागृहात कर्तव्यावर असलेले काही पोलीस कर्मचारी देखील बाधित झालेत. त्यांच्यापैकी 10 जणांचा मृत्यू झाला असून त्यांच्या वारसांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात आली असल्याचं रामानंद यांनी यावेळी सांगितले. तसेच ते पुढे म्हणाले की, २३ हजार ४२४ कैद्यांना लस देण्यात आली आहे. कारागृहातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मिळून ३ हजार ६६० जणांना लस देण्यात आली असल्याचं देखील रामानंद यांनी सांगितलं.